बार्शीत रंगणार जय श्री राम विरुद्ध जय महाराष्ट्र ? आमदार सोपल सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा

गणेश भोळे / एच सुदर्शन
बार्शी : राजकीय सरीपटावर नेहमीच चर्चेत असलेल्या बार्शी मध्ये माजी मंत्री, विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप सोपल हे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात असून सोपल यांच्या कार्यकर्त्यांनी या वृताला दुजोरा दिला आहे. सोपल यांचे कट्टर राजकीय विरोधक माजी आमदार राजेंद्र राऊत भाजपात असल्याने भविष्यात जय श्री राम विरुद्ध जय महाराष्ट्र चा नारा घुमणार असे दिसते.

केंद्रात मोदी सरकारने मोठे यश मिळवत दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. राज्यात फडणवीस सरकारची कामगिरी, मराठा समाजाला दिलेले आरक्षण, वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षणासाठी तात्काळ विधेयक मंजूर करणे, धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद आदी निर्णयामुळे सरकारची लोकप्रियता टिकून राहील असा अंदाज आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम राजकीय घडामोडींवर होत असून सत्तेचा महिमा विविध नेत्यांना आकर्षित करत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात राज्य व देशात सत्तेवर असलेल्या भाजपा व शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून वाढू लागली आहे़ सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर मंडळी या रांगेत असल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व बार्शीचे विद्यमान आ़ दिलीप सोपल हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. सोशल मिडीयावर त्यांच्या समर्थकांनी जय महाराष्ट्र च्या पोस्ट टाकण्यास सुरुवात केल्यामुळे आ़ सोपल नेमके काय करणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे़


वकीली ,युवक काँग्रेसचा कार्यकर्ता ते राज्याचा कॅबीनेट मंत्री अशी आ़ दिलीप सोपल यांची राजकीय वाटचाल आहे़ जिल्ह्यचे व राज्याचे राजकारण करीतअसताना आ़ सोपल यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदापासून राज्य शिखर बँक, मार्केटिंग फेडरेशन, इफको आदी सहकारी संस्थांचे अध्यक्ष व संचालक पद तसेच विविध महामंडळाचे अध्यक्ष अशी अनेक पदे भूषवली आहेत़

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आ़ दिलीप सोपल यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर आपल राष्ट्र जय महाराष्ट्र , जय महाराष्ट्र ,२०१९ आमच ठरलयं जय महाराष्ट्र अशा प्रकारच्या पोस्ट जुनच्या सुरुवातीला टाकल्या होत्या़ त्यानंतर गुरूवारी (ता.२०) पासून पुन्हा फेसबुकवर सोपल समर्थकांकडून आमच ठरत नाही आमच फिक्सच असतय.. आम्ही लाटात नाही थाटात येतो.. अशा पोस्ट टाकण्यात आल्याने पुन्हा एकदा सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अशा प्रकारे पोास्ट व्हायरल करणारे हे आ़ दिलीप सोपल यांचेच समर्थक आहेत़ तसेच आ़ सोपल यांचे नातू आर्यन सोपल यांनी देखील आ़ सोपल यांच्या सेना प्रवेशाच्या अनुषंगाने आलेल्या बातम्या आपल्या फेसबूक पेजवर प्रसिध्द केल्या आहेत़ बार्शीच्या राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठेला महत्व असल्याचे गेल्या विष वर्षात विधानसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून आले आहे़ मात्र या पाच वर्षात राज्यात पक्षांच्या राजकारणाला महत्व आल्याचे दिसत आहे़

तसेच शिवसेनेचे सोलापूर व उस्मानाबाद संपर्कप्रमुख तानाजीराव सावंत यांच्याशी देखील आ़ सोपल हे संपर्क ठेवून आहेत़ त्यांनी सावंत यांची मागील काही दिवसात भेट घेतल्याची चर्चा आहे़ त्यामुळे आ़ सोपल यांच्या मनात कांही तरी प्लॅन असला पाहिजे असेही बोलले जात आहे़ १९९९ पासून बार्शीच्या राजकारणात दिलीप सोपल विरूध्द राजेंद्र राऊत या दोघांत प्रत्येक निवडणुकअटीतटीची झाली आहे़ या दरम्यान झालेल्या निवडणुकांत सोपल व राऊत यांनी पक्षांची बदलाबदली केली तरी देखील बार्शीकरांनी पक्षापेक्षा व्यक्ती पाहून मतदान केले आहे़

बार्शी विधानसभेचा विचार केला तर आजघडीला आ़ दिलीप सोपल हे राष्ट्रवादीत असून ते विद्यमान आमदारआहेत तर राजेंद्र राऊत हे भाजपात आहेत त्यांच्याकडे आमदारकरी सोडून इतर सर्व सत्तास्थाने आहेत़ मात्र महायुतीत ही जागा शिवसेनेकडे आहे़ शिवसेनेत भाऊसाहेब आंधळकर हे सेनेची खिंड लढवत आहेत़ मात्र तालुक्यातील राजकारण हे सोपल व राऊत या दोघांभोवती फिरत असल्याने विधानसभेला ही जागा नेमकी सेनेकडे राहणार की भाजपाकडे जाणार याबाबत अनिश्चीतता आहे़


सोशल मिडीयावरील चर्चेप्रमाणे आ़ सोपलांनी जर ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला तर तो सोलापूर जिल्ह्यातील राष्टवादीसाठी व माजी आ़ राजेंद्र राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल़आ़ सोपल हे विद्यमान आमदार असल्यामुळे ही जागा सेनेकडे ठेवण्यासाठी पक्ष आग्रही रहाणार हे खरे मात्र राऊत यांचे ही भाजपात मुख्यमंत्री व महसुल मंत्री यांच्याशी चांगले संबध असल्याने तालुक्याच्या राजकारणात नेमके काय होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहीली आहे़

बार्शीतील सोपल व राऊत या पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी वेळोवेळी पक्ष बदलले आहेत. २००४ चा अपवाद वगळता सोपलांनी १९८५ ते २०१४ पर्यंतचे ७ पैकी ६ वेळा वेगळा पक्ष व चिन्हावर निवडणुका जिंकल्या आहेत़ त्यांनी एस काँग्रेस, काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी -अपक्ष व राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास केला आहे . तर १९९९ पासून राऊतांना २००४ च्या निवडणुकीत विजय मिळाला आहे. राऊत यांनी शिवसेना-काँग्रेस ,शिवसेना व आता भाजपा असा राजकीय प्रवास केला आहे़ १९९५ च्या राज्यातील सेना भाजप युतीच्या सरकारमध्ये सोपलांनी अपक्ष असताना राज्यमंत्री म्हणून ही काम केले आहे़


तर राष्ट्रवादी काँगे्रसने त्यांना एकदा राज्यमंत्री तर दोन वर्षे कॅबीनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे़ शरद पवार व अजित पवार यांच्याशी त्यांचे विश्वासाचे संबध आहेत़ त्यामुळे सध्या देशात व राज्यात वाहत असलेले राजकीय वारे,व त्या वाºयानूसार पिक उफणणे असो की आपल्या राजकीय विरोधकांची कोंडी करणे यापैकी कारण कोणतेही असो आ़ सोपल यांच्या समर्थकांनी टाकलेल्या राजकीय बाँब्ब मुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्र हादरले हे मात्र तितकेच खरे.

आमदार सोपल हे मुरब्बी राजकारणी असून कोणताही निर्णय इतक्या सहजपणे घेतील असे वाटत नाही. सेना प्रवेशा बाबत खरच त्यांच्या मनात काही आहे की हे वृत्त पासरवण्यामागे त्यांची कोणती राजकीय खेळी आहे हे येणार काळच ठरवणार असून सध्यातरी बार्शीत जय श्री राम विरुद्ध जय महाराष्ट्र हा नारा दिला जात आहे

धिरज करळे: