बार्शीच्या भगवंत मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा, जिल्हा नियोजन च्या बैठकीत मान्यता,खासदार आमदारांनी केला पाठपुरावा

गणेश भोळे

बार्शी – सोलापूर जिल्ह्यासाठीच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठीच्या 349.87 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.यामध्ये जगप्रसिद्ध बार्शी च्या भगवंत मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश झाला आहे.आता भगवंत मंदिर ‘ क ‘ दर्जाचे तीर्थक्षेत्र असणार आहे.

जिल्हा नियोजन समितीची आज नियोजन भवन येथे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समिती च्या याबाबत मागणी केली होती. ती मंजूर करण्यात आली. यापूर्वी ही युती शासनाच्या काळात तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला होता. सात लाख रुपयांची तरतूद ही झाली होती, नंतर मात्र निधी मिळाला नाही.

भगवंत मंदिर हे जगातील एकमेव असून याठिकाणी दरवर्षी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. मात्र त्यांच्यासाठी याठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. आता तीर्थक्षेत्र जाहीर झाल्यामुळे विकासासाठी दरवर्षी निधी उपलब्ध होणार आहे. यामधून भाविकांच्या निवासासाठी भक्त निवास,मंदिराचे सुशोभिकरण व इतर सुविधा निर्माण होतील असे आमदार राजेंद्र राऊत यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.

बैठकीत माळशिरस तालुक्यातील मौजे कचरेवाडी येथील तुळजाभवानी देवस्थान, उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे रानमसले येथील श्री क्षेत्र महिबुब सुबानी बाबा देवस्थान आणि बार्शी येथील भगवंत मंदीरास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली.

आता सुरुवातीला क दर्जा असला तरी यामध्ये वाढ होऊन ‘ ब ‘ व शेवटी ‘ अ ‘ दर्जा मिळून जास्तीचा निधी मंजूर होणार आहे. या तीर्थक्षेत्र दर्जामुळे मंदिराचा निश्चित विकास होईल असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: