मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावलं जात आहे. या पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी हे मात्र स्वत:च मुंबई येथील बॅलार्ड पिअर इथल्या ईडी कार्यालयात पोहोचले. ईडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन
कडकनाथ कोंबडी प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
‘कडकनाथ कोंबडी पालन’ व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘महारयत अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्रकरण पुढे आले असून कंपनीच्या संचालक मंडळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कंपनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप करीत शेट्टी यांनी हे प्रकरण स्वाभिमानीच्या वतीने धसास लावण्याचा इरादा व्यक्त केला आहे. तर, खोत यांनी याचा इन्कार केला असून शेट्टी खोटी माहिती पसरवत असल्याचे नमूद केले आहे. कंपनीशी संबंधित लोक आपले नातेवाईक असल्याचे शेट्टी यांनी सिद्ध करून दाखवावे असंही खोत यांनी म्हटले आहे.
कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून राज्यातील अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले असताना शहरातील ६६ जणांना पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लि. तसेच रयत अॅग्रो इंडिया या कंपनीच्या संस्थापक, संचालक, लेखापाला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रीतम माने याला अटक करण्यात आली असून कंपनीचे अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यासह हनुमंत शंकर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नीलेश शिवाजी आंबेडे (वय ३५,रा. धनलक्ष्मी सोसायटी, दत्तवाडी) यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या प्रकरणी खोत व शेट्टी या दोघात चांगलाच कलगी तुरा रंगला आहे.
मागील काही दिवसात कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह नितीन सरदेसाई यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र आता कडकनाथ घोटाळ्याची चौकशी ईडी करावी ही मागणी करण्यासाठी राजू शेट्टी स्वत:च ईडी कार्यालयात पोहोचले.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.