बडी सोच… बडा दिल… विलासराव!

बडी सोच… बडा दिल… विलासराव!

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,.. एक दिवस घेणाऱ्याने… देणाऱ्याचे हात घ्यावे!..
खरंच, द्यायलाही दानत लागते आणि घ्यायलाही बऱ्याच वेळा भाग्य लागते,तसा मी भाग्यवानच !.कारण मला जीवनात स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा सहवास, प्रेम आणि विश्वास लाभला.. बडी सोच आणि बडा दिल, हे त्यांच्या व्यक्तिमत्व वैभवातील दागिने होते.

त्यांचा सहवास लाभलेल्यांना त्या दागिन्यातील चिमुटभर दागिने जरी घेताना आले आणि ते जतन करता आले तरी जीवन सार्थक झाले, असेच म्हणावे लागेल.विषय कोणताही असो,प्रसंग कितीही बाका असो, विलासरावांचे “बडी सोच. बडा दिल’ हे गुणवैभव कधीही ढळले नाही,मला आठवते,१९९३ साली भूकंपातग्रस्तांच्या दुःखाने किल्लारी परिसरात ढसढसा रडणारे विलासराव, लंडनच्या काही वृत्तपत्रात “रस्त्यावर भूकंपग्रस्त भीक मागत आहेत”, अशी खोटी बातमी प्रकाशित झाल्यावर वैतागलेले, चिडलेले आणि व्यथित झालेले विलासराव मी अनुभवले आहेत.

त्यावेळी त्यांनी तातडीने बीबीसीच्या प्रतिनिधींना संपर्क करून सत्य परिस्थिती सांगण्याची जवाबदारी माझ्यावर सोपविली होती. मी ती पार पाडली आणि जसबीरसिंग नावाच्या बीबीसीच्या प्रतिनिधीला त्यांच्या पुढ्यात आणून उभे केले होते. असो.

प्रत्येक विषयाच्या मुळाशी पोहोचून व्यापक उत्तर शोधण्याचा आणि काढण्याचा त्यांचा शिरस्ता होता. केवळ देहबोली आणि दर्शन रुबाबदार असल्याने व्यक्तिमत्व रुबाबदार बनत नाही, तर ते मनात, प्रवृत्तीत आणि कृतीत असावे लागते, याची प्रचिती मला आयुष्यभर पदोपदी आली. त्यांचा१९९५ साली लातूर विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्या पराभवाने ते कमालीचे निराश झाले होते.

त्यावेळी मी लातूरला होतो. साहेबांनी निराश होणे आणि लोकांपासून दूर राहणे मला आणि लातुरातील अनेक मित्रांना अस्वस्थ करीत होते. अखेर एक दिवस त्यांचे बंधू दिलीप रावजी देशमुख यांच्याशी व त्यावेळचे नगराध्यक्ष एस आर काका देशमुख यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीतील पराभव हा केवळ केवळ एक राजकीय अपघात होता. मुळात लातूर मधील गल्लोगल्लीतील सामान्य माणूस, हा विलासरावांवर निस्सीम प्रेम करत होता.

तो त्यांच्याशी थेट बोलू इच्छित होता, ही बाब माझ्या आणि अनेकांच्या ध्यानी आली होती.त्यातूनच साहेबांचा लोकांशी थेट आपलेपणाचा संवाद घडवून आणण्याचा निर्धार मी केला. प्रत्येक गल्लीत एखाद्या सामान्य माणसांच्या घरी विलासरावजींना जेवायला बोलवायचे.त्या गल्लीतील रहिवाशांना घरी जेवायला बोलवायचे.घरातील छोट्या बैठकीच्या खोलीत जेवणाच्या पंगती उठवायच्या.प्रत्येक पंगतीवेळी साहेब उपस्थित राहून सर्वांशी गप्पा मारतील आणि स्वतः मात्र शेवटच्या पंगतीला मांडी घालून बसतील, असे नियोजन करण्यात आले.

हा विचार मी एस. आर. काका देशमुख यांच्याकडे मांडला. त्यांना तो खूप आवडला. पहिली जेवणावळ माझ्या घरापासून सुरू करायचे ठरले.अंबाजोगाई रोडवरील, यशोदा थिएटर जवळील माझ्या तीन खोल्यांच्या भाड्याच्या घरात पहिले जेवण ठरले. गल्लीतील लोकांना निरोप गेले. ठरल्या दिवशी विलासरावजी माझ्या घरी आले. कुठलाही लवाजमा नाही, कुठलेही शाही स्वागत नाही. सामान्य माणसात मिसळून ते शेवटच्या पंगती पर्यंत जेवायला आलेल्या गल्लीतील माणसाशी गप्पा मारत राहिले.आणि शेवटच्या पंगतीला जेवण करून माझ्या घरातून निघाले.

गप्पा,सात मजली हास्य आणि हात-वाऱ्यातून ओरिजनल विलासरावजी आमच्या गल्लीने त्यावेळी अनुभवले! सर्वकाही आटोपून मी,त्यांना त्यांच्या गाडीजवळ निरोप द्यायला जात असताना विलासरावजी मला एवढेच म्हणाले होते, “राजा माने, आज मी साधा आमदारही नाही, पण मी आजचा दिवस आणि तुम्हाला विसरणार नाही”..

मी त्यांच्या मालकीच्या दैनिक एकमतची नोकरी सोडल्यानंतरच्या काही महिन्यानंतरची ही घटना आहे. त्यांचा पराभव झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी एक पत्रकार म्हणून त्यांच्या विरोधातही लिखाण केले होते. परंतु विलासरावजींनी कधीही अंतर दिले नाही अथवा प्रेमही कमी केले. नाही पुढे मी लातूर सोडले पण त्यांच्याशी जडलेले नाते मात्र अतूट राहिले.ते पदावर असो वा, नसो विलासरावप्रेमींच्या यादीत मी सदैव अवल राहिलो.

तेही कुठल्याही पदावर राहिले तरी त्यांनी कधीच प्रेम कमी होऊ दिले नाही. अनेक भेटी झाल्या.संवाद तक्ष नेहमीच असायचा. कोल्हापुरात लोकमतचा संपादक असताना मी कधीही फोन करायचो आणि विलासराव ते तात्काळ स्वीकारायचे, हे पाहून माझे काही सहकारी तर अचंबित व्हायचे!मी सांगलीत असताना ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.

त्यावेळीही सांगलीच्या घरी तिसऱ्या मजल्यावर पायऱ्या चढून आले होते. माझी आई-अक्का, पत्नी सौ मंदा यांच्याशी आपलेपणाने बोलले माझी कन्या शिल्पाने त्यावेळी औक्षण केले होते. तिसऱ्या मजल्यावर आले ते स्वर्गीय पतंगरावजी, विलासकाका उंडाळकर, कल्लाप्पाअण्णा आवाडे,जयवंतराव आवळे या दिग्गजांच्या फौजफाट्यासह अक्षरशः दाटीवाटीने सगळी मंडळी माझ्या त्या छोट्याशा फ्लॅट मधील बैठकीच्या खोलीत गप्पांमध्ये रममाण झाली.

आज कोऱोना संकटाने जगाला पुरते जमिनीवर आणले.भल्याभल्यांना प्रेम, माणुसकी, आपली माणसं याची महती पटवून देण्याचे काम कोरोना केले. या पार्श्‍वभूमीवर स्वर्गीय विलासरावजींच्या आठवणी अधिक टवटवीत झाल्या.मला जीवनात चांगल्या पद्धतीने आणि नीतिमत्तेने जगण्याचे व पत्रकारिता करण्याचे धडे माझे “गॉडफादर” राजेंद्रबाबू दर्डा यांनी दिले, तर स्वर्गीय विलासरावजींनी जीवनाला “बडी सोच ..”ची जोड देण्याचा संस्कार माझ्यावर घडविला..

२६ मे हा दिवस १९९१ पासून मी कधीच विसरलो नाही.. स्वर्गीय विलासरावजींची आज जयंती… बडी सोच बडा दिन.. स्वर्गीय विलासरावजींच्या विनम्र अभिवादन!
-राजा माने

छायाचित्र 1) स्वर्गीय विलासरावजींनी सांगली येथील माझ्या निवासस्थानी स्वर्गीय डॉ. पतंगरावजी सोबत भेट दिली तेव्हा…

छायाचित्र 2) माझी कन्या शिल्पा विलासरावजींचे औक्षण करताना..

ग्लोबल न्युज नेटवर्क: