बँक खाते हॅक करुन 60 हजार  काढले

बार्शी,
बार्शीतील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील बचत खाते हॅक करुन ऑनलाईन पद्धतीने खात्यावरुन 60 हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध बार्शी शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
संतोष नागनाथ ताटे (वय 42, रा. वैराग, ता. बार्शी) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. संतोष ताटे हे वैराग येथील असून ते प्राथमिक आश्रम शाळा, जामगांव, ता. माढा येथे शिपाई म्हणून नोकरीस आहेत. त्यांचे बँक खाते बार्शीतील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे आहे. तेथे त्यांनी मोबाईल क्रमांक दिलेला आहे. दि. 22 मार्च रोजी रात्री 11.50 वाजता ते जामगांव येथील आश्रम शाळेत असताना त्यांच्या खात्यातून 20 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर 12.05 मि. 20 हजार रुपये गेल्याचा मेसेज आला. परंतु ते मेसेज त्यांनी पाहिले नव्हते. त्यानंतर 24 मार्च रोजी दुपारी 12.36 वा. पुन्हा 20 हजार रुपये गेले. 24 मार्चला रविवार असल्याने बँकेला सुट्टी असल्याने त्यांनी एटीएम कार्ड ऑनलाईन बंद केले. अशा प्रकारे त्यांचे एकूण 60 हजार रुपये त्यांनी कोणत्याही प्रकारची कोठेही माहिती न देता खात्यामधून पैसे गेले आहेत. त्यांनी बँकेमध्ये जावून चौकशी करुन बँकेचे स्टेटमेंट घेवून बुधवारी उशीराने फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध भादंवि 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 अन्वये गुन्हा नोंद झाला असून याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील हे करीत आहेत.

admin: