फलटण नगरीत अवघा रंग एक झाला,माऊलींच्या पालखीचे राजेशाही थाटात स्वागत

फलटण/औदुंबर भिसे

जैन धर्मीय व महानुभाव पंथाच्या दक्षिण काशीत भागवत धर्माची पताका उंचावत निघालेल्या माऊलीसह वैष्णवांचे फलटण नगरीत आगमन झाल्याने ” अवघा रंग एक झाला ” याचीच अनुभूती आली .

तरडगांव येथे माऊली मुक्कामी होते. पहाटे सोहळा प्रमुख  योगेश देसाई    यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. कर्णेकर्‍याने तिसरा कर्णा वाजविला आणि "  पुंडलिक वरदे हरि विठ्ठल "  चा एकच जयघोष झाला. पालखीने तरडगांव सोडले आणि भक्तीचा जागर करीत वैष्णवांचा महासागर पंढरीकडे निघाला.

कैवल्याचा पुतळा प्रकटला भुतला
चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा
अशा माऊली प्रती भाववेडे होऊन सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणचे भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येते होते. त्यामुळे पालखी मार्ग परिसर हा भाविकांनी फुलून गेला होता. काळजच्या दत्त मंदिरात आणि सुरवडीला सकाळाचा विसावा घेण्यासाठी माऊली सकाळी ९.३० वाजता पोहोचल्या. सकाळी १० वाजता सकाळचा विसावा घेवून माऊली दुपारच्या नैवेद्यासाठी दुपारी १२ वाजता निंभोरे ओढा येथे पोहोचल्या. दुपारचा नैवेद्य व भोजनाचा आनंद घेवून दुपारी २ वाजता हा सोहळा फलटणकडे मार्गस्थ झाला.
ढगाळ वातावरणात माऊलींचा पालखी सोहळा सायंकाळी ४ वाजता वडजल येथे विसाव्यासाठी थांबला. ढगाळ वातावरण असल्याने वारकर्‍यांना पावसाचीही प्रतिक्षा होती. मात्र पावसाने हुलकावणी दिली.

वडजल येथील विसाव्यानंतर सोहळा फलटणकडे मार्गस्थ झाला. लाखो वारकर्‍यांच्या मुखातून माऊली.....माऊली.... नामाचा अखंड जागर सुरू होता. सोहळा पुणे नाका येथे सायंकाळी ५.१५ वाजता पोहोचला. येथे फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्षा सौ.निता नेवसे, उपगनराध्यक्ष नंदकुमार भोईटे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, महानंदचे व्हा चेअरमन डी के पवार, तालुका दुध संघाचे चेअरमन धनंजय पवार, धनंजय साळुंखे  यांच्यासह नगरवासियांनी सोहळ्याचे उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.  

सायंकाळी ५.४५ वाजता अश्‍व मलठण, उंबरेश्‍वर चौक, संत हरीबाबा मंदिर मार्गे तीन बत्ती चौकातून कसबा पेठेत पोहोचले. अश्‍वापाठोपाठ सायंकाळी ६.१५ वाजता माऊलींचे आगमन झाले. येथे बालशिवाजी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने माऊलींच्या सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

पुढे नाईक-निंबाळकरांच्यावतीने श्रीराम मंदिर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवबाबा नाईक-निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत अजयसिंहराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह नाईक-निंबाळकर परिवारातील सदस्य व ग्रामस्थांनी स्वागत केले व दर्शन घेतले. येथील स्वागत स्विकारून सोहळा गांधी चौक, शासकीय कार्यालय मार्गे सायंकाळी विमानतळावर पोहोचला. येथे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी माऊलीसह वैष्णवांचे स्वागत केले.

येथील १०० एकराच्या विस्तीर्ण अशा विमानतळावर वैष्णवांच्या राहुट्या लागल्या असून मध्यभागी ज्ञानराजांचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. त्यामुळे हा पालखी तळ म्हणजे जणू ज्ञानराजांचा दरबारच आहे असेच चित्र दिसत होते.
उद्या शुक्रवार दि ५ रोजी हा सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामासाठी मार्गस्थ होईल .

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: