प्रलंबित मागण्यांसाठी बार्शी पंचायत समितीसमोर ग्रामसेवक युनियनचे धरणे आंदोलन


प्रलंबित मागण्यांसाठी बार्शी पंचायत समितीसमोर ग्रामसेवक युनियनचे धरणे आंदोलन

बार्शी:
राज्यातील 22 हजार ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी लेखी निवेदने देवूनही मागण्या मान्य न केल्याने राज्यातील ग्रामसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून असहकार, काम बंद, मोर्चे असे आंदोलनाचे स्वरुप असणार आहे. बार्शीत ग्रामसेवक युनियनच्यावतीने पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
पंचायत समिती कार्यालयासमोर संघटनेचे तालुकाध्यक्ष अंकुश काटे, सचिव गोपाळ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामसेविका सहभागी झाले होते. 
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 9 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत असहकार असणार असून यामध्ये एकदिवशीय धरणे, निदर्शने, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन, पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन, ग्रामविकास मंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन व 22 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन केले जाणार आहे. या काळात ग्रामसेवक जनतेची दैनंदिन कामे करतील. मात्र पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना कोणताही अहवाल सादर करणार नाहीत व त्यांच्या बैठकांना जाणार नाहीत. 

या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर चौरे, अशोक घुगे, रामेश्वर भोसले, मेघा पाटील, अर्चना घोळवे उपस्थित होते.

या आहेत मागण्या

युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे व सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समान काम समान दाम, समान वेतनश्रेणी, लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामविकास अधिकार्‍यांच्या पदामध्ये वाढ करणे, पदवीधर ग्रामसेवकांच्या नेमणुका करणे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करणे. 2005 अन्वये ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करणे, आदर्श ग्रामसेवकाला आगावू वेतन वाढ करणे, एक गांव एक ग्रामसेवक पद निर्मिती करणे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु केले असल्याचे तालुकाध्यक्ष अंकुश काटे यांनी सांगितले.

बीडीओ निवेदन घेण्यासाठी आलेच नाहीत
पंचायत समितीच्या आवारात हे आंदोलन सुरु असताना प्रभारी गटविकास अधिकारी महेश सुळे हे निवेदन घेण्यासाठी बाहेर आले नाहीत. उलट तुम्हीच आंदोलन थांबवून माझ्या केबिनमध्ये निवेदन घेवून या, असे सांगावयास ते विसरले नाहीत. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: