प्रदेश भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नेत्यांना कानपिचक्या “मोदींमुळे विजय मिळाला आहे हे लक्षात ठेवा”

पन्नास टक्के आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता

युती झाली न झाली तरी सर्व जागा जिंकण्याची तयारी करा : पक्षाचा निर्देश

मुख्यमंत्री कोण हे ठरले आहे, त्याची चिंता न करता काम करा

मुंबई: आज मुंबईत दादर येथे प्रदेश भाजपच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांना आणि निवडून आलेल्या खासदार आणि पक्षाच्या आमदारांना चांगल्याच कानपिचक्या दिल्याचे समजते. “आपल्याला मिळालेला विजय हा मोदींच्या कर्तृत्वामुळे आणि करिष्म्यामुळे मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. तक्रारी न करता जनतेची कामे मतदारसंघात करा,” असे मुख्यमंत्र्यांनी पदाधिकारी आणि नेत्यांना सुनावले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पन्नास टक्के आमदारांचे तिकीट कापले जाईल असे संकेत आज झालेल्या बैठकीतून मिळत आहेत.

आज मुंबईत दादर येथे पार पडलेल्या प्रदेश भाजपच्या बैठकीत लोकसभेत निवडून गेलेल्या पक्षाच्या खासदारांचा सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी काही लोकप्रतिनिधींनी तक्रारीचा सूर लावताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना वरील वाक्य सूनवल्याचे कळते. विधानसभा निवडणूक तयारी संदर्भातील हे तर मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांनी घेतले.

एकूण बैठकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत तब्बल पन्नास टक्के म्हणजे अर्ध्या आमदारांची तिकिटे कापली जातील आणि त्या त्या ठिकाणी नवीन उमेदवार दिला जाईल असे चित्र उभे राहिले आहे. त्यामुळे भाजपच्या अमदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

युती होवो न होवो, सर्व जागा जिंकायच्यात, मुख्यमंत्री कोण हे ठरले आहे,
आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेसोबत युती करूनच लढायची असली तरी युतीसंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र घेतील. पक्षाच्या आमदारांनी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ती चिंता न करता सर्व 288 जागा कोणाच्याही वाट्याला आल्या तरी जिंकण्यासाठी जोरदार काम सुरू करावे असे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत.

सर्व जागांवर भाजपचाच उमेदवार उभा आहे समजून काम करायला लागा असे सांगण्यात आले आहे. आपापल्या मतदारसंघात जोर लावा, पक्षाकडून आवश्यक ती सर्व मदत मिळेल असेही आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

“मुख्यमंत्री कोण होणार हे तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे शिवसेना बाहेर काहीही बोलत असली तरी, मुख्यमंत्री कोणाचा याची चिंता न करता काम करा” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आमदारांचा उत्साहही वाढवला.

या बैठकीत अनेक भाजप आमदारांनी युती करू नये असेही मत मंडल्याचे कळते. मात्र त्या आमदारांना पक्षश्रेष्ठींनी फारसा प्रतिसाद दिला नाही, असेही कळते. मात्र ज्या मोठ्या प्रमाणात ही युतीविरोधी मते व्यक्त झाली, त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे, अशी माहिती मिळते आहे.

शिवसेने सोबत युती झाली आणि नाही झाली तर अशा दोन्ही परिस्थितीत निवडणूकलीची गणिते वेगळी असतील, त्यामुळे आमदार धास्तावले आहेत. आपण केलेली कामे आणि मतदारसंघातील आपला प्रभाव पक्षश्रेष्ठींचे लक्षात आणून देण्याची भाजप आमदारांची धडपड आता सुरू झाली आहे.
मात्र इतक्या महत्वाच्या बैठकीला नाथाभाऊ खडसे अनुपस्थित होते.

धिरज करळे: