प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने विठुरायाचा थकवा दूर होण्यासाठी आयुर्वेदिक काढा,वाचा सविस्तर-

पंढरपूर : यथा देहे तथा देवे, या उक्तीप्रमाणे विठूरायाची काळजी घेण्यासाठी अनोख्या प्रथा-परंपरा आहेत. आषाढी यात्रेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन व्हावे यासाठी अहोरात्र उभा राहिलेल्या विठुरायाचा थकवा दूर व्हावा यासाठी विविध प्रकारच्या वनस्पतींपासून बनवलेला आयुर्वेदिक काढा देवाला दाखवण्याची प्रथा आहे.

आज प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने देवाला लिंबू साखर लावून गरम पाण्याने स्नान घालण्यात आले आणि आयुर्वेदिक काढा दाखवण्यात आला. आपण जशी वेगवेगळ्या ऋतू मध्ये आरोग्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने विठुरायाची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रथा परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहेत.

आषाढी आणि कार्तिकी यात्रेत जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर अहोरात्र उघडे ठेवले जाते. सतत उभा राहून देवाची पाठ दुखू नये यासाठी विठुरायाच्या मूर्तीच्या पाठीमागे लोड ठेवला जातो. देवाचा झोपण्याचा पलंग काढून ठेवला जातो. आषाढी यात्रा झाल्यावर प्रक्षाळ पूजा केली जाते. या दिवशी संपूर्ण मंदिर धुतले जाते.

देवाचा थकवा दूर व्हावा यासाठी देवाला लिंबू साखर लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते. रात्री लवंग, वेलदोडे, जायफळ, सुंठ, दालचिनी, मिरे आदी विविध वनस्पतींपासून बनवलेला आयुर्वेदिक काढा दाखवला जातो.

उन्हाळ्यामध्ये देवाच्या अंगाचा दाह होऊ नये यासाठी चंदन उटी पूजा केली जाते. थंडीमध्ये दररोज रात्री शेजारती च्या वेळी देवाच्या मूर्तीच्या दोन्ही कानावरून मुलायम कापडाची पट्टी गुंडाळली जाते.

ऋतुमानानुसार देवाला दाखविण्यात येणाऱ्या महाप्रसादात देखील बदल करण्याची प्रथा आहे.
या निमित्ताने देवाचे गाभारे आकर्षक फुलानी सजविण्यात आले होते. यात्रेतील शीण घालविण्यासाठी औषधी काढ्याचा देवाला नैवेद्य दाखविन्यात आला.

आज विठ्ठल व रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकारांनी सजविण्यात आले होते. येथील पश्चिमव्दार व्यापारी संघटनेच्या वतीने प्रक्षाळपूजेनिमित्त हजारो भाविकांना अन्नदान करण्यात आले आहे. याची सुरूवात सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन आणि विविध वारकरी सांप्रदायिक महाराजांचे संतपूजन करून करण्यात आली.

पश्चिमव्दार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव महाजन यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षापासून प्रक्षाळपूजे दिवशी व्यापा-यांकडून अन्नदान केले जात असते. याप्रसंगी ह.भ.प. वा.ना.उत्पात ,वारकरी सांपदायिक महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते. 
याप्रसंगी पश्चिमव्दार व्यापारी संघटनेकडून सर्व महाराजमंडळीची संतपूजा करण्यात आली. आणि अन्नदानाला सुरूवात करण्यात आली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: