काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लखनौ पोलिसांनी आपला गळा दाबल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रियंका गांधी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱयावर आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करताना हिंसाचार भडकावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या माजी पोलीस महानिरीक्षक एस. आर. दारापुरी आणि काँग्रेसचे प्रवक्ते सदफ जफर यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी प्रियंका गेल्या होत्या त्यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसांनी प्रियंका यांना रस्त्यावरच रोखले. पुढे जाऊ देणार नाही असे सांगितले. यावर प्रियंका यांनी गाडीतून उतरून पायी चालत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी घेराव घालून थांबवले आणि धक्काबुक्की केली. इतकेच नाही तर गळा दाबला. त्यानंतर एका कार्यकर्त्याच्या स्कुटीवरून जातानाही पोलिसांनी आपल्याला अडवले, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.