पुण्याच्या वरचे हे धरण 100 टक्के भरले, मुठा नदीत विसर्ग सुरू

पुण्याला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो.

पुणे: पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी धरण प्रकल्पातील खडकवासला हे धरण सततच्या पावसामुळे १०० टक्के भरले आहे. या धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी १७१२ क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. जर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला, तर पाण्याचा विसर्ग आणखी वाढविला जाईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. मुठा नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

पुण्याला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. या चारही धरणांमध्ये मिळून सध्या ११.५३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या एकूण क्षमतेच्या ३९.५४ टक्के साठा सध्या धरणांत जमा झाला आहे. 

पानशेत धरण ४४ टक्के, वरसगाव धरण ३२ टक्के, टेमघर धरण १७ टक्के भरले आहे. या चारही धरणांच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेल्यावर्षी या धरणांमध्ये याच दिवशी १०.७२ टीएमसी एवढाच साठा शिल्लक होता. टेमघर धरणाच्या भिंतीचे काम सुरू असल्यामुळे या धरणामध्ये गेल्यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात आले नव्हते. यंदा हे काम पूर्ण झाल्याने या धरणातही पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात येणार आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा


ग्लोबल न्युज नेटवर्क: