पुणेः कोरोना व्हायरस या आजाराचे रुग्ण आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. पुण्यात देखील रुग्ण आढळत असून आज सकाळी दोघा दाम्पत्याना घरी सोडण्यात आले. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्याच्या नायडू रुग्णालयात आणखी तिघांची प्रकृती सुधारली असून त्यांनादेखील डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या रुग्णांना डिस्चार्ज देण्याअगोदर एका दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे नायडू रुग्णालयातून आज पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसंच तसेच 48 तासांत शहराच्या हद्दीत एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची भर पडली नसल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील पहिलं कोरोनाग्रस्त दाम्पत्य यांच्यासह दाम्पत्याची मुलगी, दाम्पत्याला मुंबईहून घेऊन येणारा कॅब चालक आणि दुबई ट्रिपमधीलसह एक प्रवासी यांचा यात समावेश आहे. यातील दाम्पत्याचे दुसरे निगेटिव्ह रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा तर उरलेल्या तिघांचे निगेटिव्ह रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी आले आहेत. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ते आता ठणठणीत बरे झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
तिघांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी टेस्ट एनआयव्हीकडून पुन्हा निगेटिव्ह आली. त्यामुळे या तीनही कोरोनामुक्त नागरिकांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला. तिघांनाही 10 मार्चला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 14 दिवसांनी त्यांची पहिली टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र घरी सोडल्यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.
या संदर्भात महापौर मोहोळ म्हणाले की, कोरोनाचं संकट मोठं असलं तरी त्यावर मात करता येत आहे, हा विश्वास महत्वाचा आहे. यासाठी महापालिकेची आरोग्ययंत्रणा अहोरात्र कष्ट घेत असून योग्य समन्वय आम्ही ठेवला आहे. कोरोनामुक्त होता येत असले तरी नागरिकांनी काळजी घेणं आवश्यकच आहे.