पाच वर्षे जनतेसाठी विधिमंडळ व रस्त्यावर संघर्ष केला म्हणून पक्षाला सत्तेची संधी मिळाली-अजित पवार

ग्लोबल न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21 व्या वर्धापनदिना निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.विधिमंडळात, विधिमंडळाबाहेर रस्त्यावर उतरून जनतेसाठी संघर्ष केला. त्यातून पक्षाला ही संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी, इच्छा,आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. असा मनोदय या निमित्ताने त्यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवारांची पोस्ट जशीच्या तशी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्तानं महाराष्ट्रातील तमाम जनतेला तसंच पक्ष कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! आपला विश्वास, आपली साथ आणि आपला पाठिंबा सदैव पक्षासोबत राहील, याची मला खात्री आहे.

गेल्या २१ वर्षांच्या वाटचालीत पक्षानं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत दिलेलं योगदान, राज्यात उभी केलेली युवा कार्यकर्त्यांची, नेतृत्वाची सक्षम फळी हीच पक्षाची ताकद आहे. हीच ताकद भविष्यातही महाराष्ट्राला प्रगतीकडे आणि पक्षाला उज्ज्वल यशाकडे घेऊन जाईल.

शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या प्रत्येक संकटात आदरणीय शरद पवार साहेबांसह पक्षाचा कार्यकर्ता मदतीसाठी धावून गेला आहे. पक्षाची आजवरची यशस्वी वाटचाल ही आदरणीय साहेबांचं समर्थ नेतृत्व आणि लाखो कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ आहे.

आज, पक्ष पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आहे. ही संधी गेली ५ वर्षे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षातून मिळाली आहे. तत्कालिन सरकारच्या शेतकरीविरोधी, लोकविरोधी धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा, हल्लाबोल यात्रा, परिवर्तन यात्रा काढली. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावर ‘जेलभरो’सारखी आंदोलनं केली.

विधिमंडळात, विधिमंडळाबाहेर रस्त्यावर उतरून जनतेसाठी संघर्ष केला. त्यातून पक्षाला ही संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी, इच्छा,आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे.

दरम्यान, महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करीत असल्यानं पक्षाचा वर्धापन दिन अत्यंत साधेपणानं साजरा करायचा आहे. कुठेही जाहीर कार्यक्रम घ्यायचे नाहीत. गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंगचे, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळा, असं आवाहन पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करतो.

हे केले आवाहन

गेली २१ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, सर्वसमावेश विकासाच्या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेऊन मागासवर्गीय, आदिवासी,भटके-विमुक्त बांधव, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्व समाजघटकांच्या न्याय हक्कासाठी काम करत आहे. पक्षाचे पुरोगामी, प्रगतशील विचार, पक्षाची ध्येय-धोरणं आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अधिकाधिक युवकांनी, युवतींनी, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं. अधिकाधिक समाजघटकांना पक्षाशी जोडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन करतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: