पाकिस्तानच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना सतवलं; १५ षटकांत बिनबाद १२५ धावा

दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात सामना होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १५१ धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी १५२ धावांचे आव्हान दिले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामी जोडीने शानदार सुरुवात केली. या दोघांनी भारतीय गोलंदाजी चांगली खेळून काढताना अर्धशतकी भागीदारी केली. या दरम्यान, त्यांनी काही चांगले मोठे फटके मारले. या दोघांनीही १० षटकात आपली विकेट न जाऊ देता संघाला ७१ धावांपर्यंत पोहचवले.

विराटचं अर्धशतक

पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. मात्र, भारताला पहिला धक्का पहिल्याच षटकात बसला. शाहिन शाह आफ्रिदीने चौथ्या चेंडूवर रोहित शर्माला शुन्यावर पायचीत करत माघारी धाडले. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली मैदानात उतरला.

मात्र, शाहिन आफ्रिदीने भारताला दुसरा धक्काही लवकर दिला. तिसऱ्या षटकात केएल राहुलला त्याने ३ धावांवर त्रिफळाचीत केले. पण, यानंतर सूर्यकुमार यादवने कर्णधार विराटला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तोही फार काळ टिकू शकला नाही. सूर्यकुमार ८ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह ११ धावा करुन बाद झाला. त्याला हसन अलीने ६ व्या षटकात बाद केले.

यानंतर मात्र, रिषभ पंतने विराटला चांगली साथ दिली आणि भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. हे दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले असतानाच शादाब खानने पंतला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. पंत ३० चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा करुन बाद झाला.

त्यानंतर रविंद्र जडेजाने विराटला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, रविंद्र जडेजाला हसन अलीने १३ धावांवर १८ व्या षटकात बाद केले. दरम्यान, विराटने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. टी२० विश्वचषकातील विराटचे हे १० वे अर्धशतक होते. पण, विराटचा अडथळा १९ व्या षटकात शाहिन आफ्रिदीने दूर केला. विराट ४९ चेंडूत ५७ धावा करुन रिझवानकडे झेल देऊन बाद झाला. अखेरच्या षटकात हार्दिक पंड्या ११ धावांवर हॅरिस रौफच्या विरुद्ध बाद झाला. अखेर भुवनेश्वर ५ धावंवर नाबाद राहिला. भारताने २० षटकात ७ बाद १५१ धावा केल्या.

पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच हसन अलीने २ विकेट्स घेतल्या. तर, हॅरिस रौफ आणि शादाब खानने प्रत्येकी १ विकेट घेतली.

असे आहेत ११ जणांचे संघ

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीस रौफ, शाहीन आफ्रिदी.

ग्लोबल न्युज नेटवर्क: