पांड्याचे जबरदस्त कमबॅक, 10 षटकारांची आतिषबाजी अन् 105 धावांची वादळी खेळी

टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या फिट झाला आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या दौऱ्याला मुकलेल्या पांड्याने दमदार पुनरागमन केले असून याच महिन्यात हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला खणखणीत इशारा दिला आहे. पांड्याने अवघ्या 39 चेंडूंमध्ये 10 षटकारांची आतिषबाजी करत 105 धावांची शतकी खेळी केली.

बुधवारी डीवाय पाटील टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये (DY Patil T20 Cup) क्रीडाप्रेमींना हार्दिक पांड्या नावाचे वादळ पाहायळा मिळाले. रिलायन्स 1 (Reliance 1) आणि कॅग (CAG) या संघामध्ये रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे रंगलेल्या लढतीत पांड्याने वादळी खेळी केली आहे. तब्बल सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर मैदानात उतरलेल्या पांड्याने 10 उत्तुंग षटकार आणि आठ चौकारांसह शतक झळकावले. पांड्याच्या या दमदार खेळीच्या बळावर रिलायन्स 1 (Reliance 1) संघाने 20 षटकांमध्ये 5 बाद 252 धावांचा डोंगर उभारला.

मैदानावर जबरदस्त कमबॅक केल्यानंतर हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावरूनही आनंद ओसंडून वाहात होता. माझ्यासारख्यांसाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. मी गेल्या सहा महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानावर उतरलेलो नाही. दुखापतीनंतर ही माझ्यासाठी मोठी संधी होती आणि मला माझी शारिरीक क्षमताही जाणून घेता आली, असे हार्दिक पांड्या म्हणाला. तसेच या खेळीनंतर मी आनंदी असून सर्व सुरळीत असल्याचे तो म्हणाला.

दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकला
हार्दिक पांड्याच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे त्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आली. पाठीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी डॉक्टरांनी त्याला पाच महिन्यांचा आराम घेण्याचा सल्ला दिला होता. मध्यंतरी तो फिट झाल्याचेही वृत्त आले होते, मात्र न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचार झाला नाही. यादरम्यान विदेशातून पुन्हा तपासणी करून आल्यानंतर पांड्याने नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (National Cricket Academy) गोलंदाजीचा सरावही केला.

सप्टेंबरमध्ये खेळला अखेरचा सामना
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. बंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सप्टेंबर, 2019 ला हा सामना रंगला होता. त्यानंतर तो पाठीच्या दुखापतीमुळे मैदानात उतरू शकला नाही. मात्र याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्घ होणाऱ्या तीन एक दिवसीय मालिकेसाठी आणि आयपीएलसाठी तो फिट आहे. आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना 12 मार्चला धर्मशाळा, दुसरा सामना 15 मार्चला लखनौ आणि तिसरा सामना 18 मार्चला कोलकाताला रंगणार आहे. तर आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये पहिला सामना रंगणार आहे. पांड्या मुंबईचे प्रतिनिधित्व करतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: