नागपूर | नागपूर महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची बदली झाली. यानंतर नागपुरात चर्चा सुरू झाली की मुंढे कधी येणार. आज प्रत्यक्षात तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदाची सूत्र हातात घेत अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली. तर दुसरीकडे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
नागपूर महानगरपालिका, राज्याच्या उपराजधानीची महापालिका अतिशय महत्त्वाची आहे. या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. या महापालिकेत आता कर्तव्यदक्ष आणि नागरिकांच्या गळ्यातील ताईत ठरणारे आणि जिथे जातील तिथे आपली कारकीर्द गाजवणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेतला आहे. त्यांची बदली नागपुरात झाल्याची बातमी आली आणि नागरिकांना मध्ये उत्सुकता वाढली होती. नागरिकांच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या. त्याच अपेक्षा पाहता मुंडे यांनी साडे नऊच्या ठोक्याला पदभार स्वीकारला. लगेच अधिकाऱ्यांची जवळपास पाऊण तास मिटिंग घेत त्यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंडे यांनी अधिकाऱ्यांना तुम्ही मला घाबरू नका, मिटिंगला येताना वेळेत या, मिटिंगमध्ये कोणाचाही मोबाईल वाजता कामा नये, नियमांचं काटेकोर पालन करा, कुठल्याही कामात अनियमितता होणार नाही याची काळजी घ्या. अशा सूचना देत त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला. आज मेट्रोचा लोकार्पण सोहळा असल्याने त्या कार्यक्रमाला ते निघून गेले. मात्र मुंडे महापालिकेत पोहचताच त्या ठिकाणी काहीकाळ वातावरण बदलले पाहायला मिळालं