नाही नाही म्हणत राष्ट्रवादी च्या या माजी खासदाराने घेतला भाजप प्रवेशाचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मात्र महाडिक यांच्याकडून वारंवार या चर्चा फेटाळण्यात आल्या. पण आज अखेर आपण भाजपमध्ये जाणार असल्याचं महाडिक यांनी स्वतः जाहीर करून ही चर्चा खरी असल्याचे सिद्ध केले.

धनंजय महाडिक यांचा 1 सप्टेंबर रोजी सोलापूरमध्ये प्रवेश होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत महाडिक भाजपचं कमळ हाती घेतील. लोकसभेतील निवडणुकीतील उमेदवारच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना कोल्हापूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीसह काँग्रेसमधीलही स्थानिक नेत्यांचा विरोध होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या पारड्यात आपलं मत टाकत त्यांना उमेदवारी दिली. देशातील मोदी लाट आणि काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी विरोधात केलेलं काम यामुळे महाडिकांना मोठा पराभव सहन करावा लागला.

धनंजय महाडिक काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये तळ ठोकून होते. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतरच त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आता कोल्हापूरमधील ताकदवान नेता सोडून जात असल्याने राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसणार आहे.

दरम्यान, महाडिक यांनी मे महिन्याच्या अखेरीस भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हाच धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्यानंतर धनंजय महाडिक यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळली होती.

‘साखर कारखान्यांच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन दिलं जाणार आहे. पण काही कारखान्यांना या योजनेत स्थान देण्यात येणार नव्हतं. यासंदर्भातच मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. आजही अनेक कारखानदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. मी भाजपमध्ये जाणार ही अफवा आहे. भविष्यातही मी राष्ट्रवादीच राहणार आहे,’ असा दावा तेव्हा महाडिक यांनी केला होता. पण आता विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार, हे निश्चित झालं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: