भाजपकडून उदयनराजेंना निरोप, पक्षप्रवेश मोदींच्या उपस्थितीत होणार?

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय हालचाली सुरु झाल्या आहे. पश्चिम महाराष्ट्रात खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला जबर धक्का बसणार, हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असून, प्रवेश करण्याच्या तारखेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.त्यांच्या राजेपणाला साजेसा प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत त्यांना भाजपमध्ये घेतलं जाईल अशी चर्चा आहे

१ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं संगितले जात होते. मात्र उदयनराजे अमित शहा यांच्या नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे. कारण उदयनराजे भोसले यांना खासदारकीचा राजीनामा देण्याचा निरोप भाजपकडून देण्यात आला आहे. जोरदार शक्तीप्रदर्शनासह उदयनराजेंना पक्षात घेण्याचा भाजपचा विचार आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. आठ- दहा दिवसांपुर्वी पूरग्रस्तांचे निमित्त साधत उदयनराजे मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले होते. उदयनराजे- फडणवीस चर्चेवेळी निवडणूक प्रक्रियेसंबंधी माहितीगार अधिकारी वर्षा बंगल्यावर बोलावून घेण्यात आला होता. उदयनराजेंनी आता राजीनामा दिला तर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबर होईल कां, याची विचारणा त्या अधिकाऱ्याला करण्यात आली. मात्र तातडीने उत्तर मिळाले नाही. त्यामुळे केंद्रिय निवडणूक आयोगाकडून माहिती घेवू आणि त्यासंबंधी कळवू, असे उदयनराजेंना सांगण्यात आले होते.

पोटनिवडणूक सोपी जावी, म्हणून गाठीभेटीही सुरू केल्या आहेत, मात्र पोटनिवडणुकीसदर्भात त्यांना भाजपकडून काही निरोप येत नव्हता. अखेर तो निरोप काल रात्री मिळाला. पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबर शक्य असल्याचे त्यानंतर सांगण्यात आले. त्यानंतर उदयनराजेंनी अंतिम निर्णयासाठी खलबते सुरू केली आहेत. उदनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: