नवी दिल्ली । भाजपवर मागील अनेक दिवसांपासून नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज सांयकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. एकनाथ खडसे हे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतील अशी शक्यता होती मात्र त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 35 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना भेटणे खडसे यांनी टाळले.
पक्ष नेतृत्वाला भेटण्यासाठी खडसे हे दिल्लीत गेले होते. परंतु, त्यांची आज कोणत्याच नेत्यांबरोबर भेट होऊ शकली नाही. सायंकाळी खडसे यांनी ६ जनपथ या शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीत काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. दोनच दिवसांपूर्वी जळगाव येथे खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांनीच केल्याचा आरोप करत त्यांनी तसे पुरावे पाटील यांना सादर केले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या काही नेत्यांचे नाव न घेता हल्लाबोल केला होता.