नाराज आ. तानाजी सावंतांनी दिली भाजपला साथ; उस्मानाबाद जि. प.अध्यक्षपदी भाजपच्या अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी धनंजय सावंत

उस्मानाबाद :
मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेनेवरच ‘बानञ्ज मारला.  उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत तानाजी सावंतांनी आ. ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजपला साथ  दिली. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली.

उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर आणि आ.राणाजगजितसिंह पाटील तर शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि आ.ज्ञानराज चौघुले यांचे गट एकत्र आले.  त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत   30 विरुद्ध 2३ मतांनी अस्मिता कांबळे यांची अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्ष पदासाठी धनंजय सावंत यांचा विजय झाला.

तानाजी सावंत यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिल्यामुळे जिल्हा परिषद मध्ये अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी उभारलेल्या अंजली शेरखाने यांच्यासोबत शिवसेनेचे बाळासाहेब जाधव एकमेव जि.प.सदस्यांनी साथ दिली.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीची घोषणा झाली असली तरी उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र संभ्रमाचं वातावरण होतं. राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणं बदलली. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी राणा पाटील व शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा आमने सामने आले होते. परंतु तानाजी अस्त्रामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा गट एकाकी पडला आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत एकूण 55 जागा असून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 28 हा बहुमताचा आकडा आहे. राष्ट्रवादी 26, शिवसेना 11, काँग्रेस 13, भारतीय जनता पक्ष 04 आणि अपक्ष 01 असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील हे आमदार झाल्याने एक जागा रिक्त झाली असून सेनेचे संख्याबळ 10 झाले आहे.

आज झालेल्या निवडणुकीत आ.राणाजगजितसिंह पाटील गट १७, आ.तानाजी सावंत व आ. चौगुले गट ७, भाजपा ४, अपक्ष १, आणि कॉंग्रेस १ या प्रमाणे ३० मते मिळुन अध्यक्ष व उपाध्यक्षदावर कब्जा केला. तर शिवसेनेच्या छाया कांबळे या गैर हजर राहिल्या त्यामुळे अध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या उमेदवार अंजली शेरखाने यांना शिवसेनेचे २, कॉंग्रेस चे १२ व राष्ट्रवादी ९ या प्रमाणे २३ मतावर समाधान मानावे लागले.

वडिलानंतर मुलगी झाली अध्यक्ष 

उस्मानाबाद जि.प.च्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या प्रा. अस्मिता कांबळे यांचे वडिल शिवदास कांबळे यांनी याच जिल्हा परिषद मध्ये समाजकल्याण सभाती पद व अध्यक्ष पद भुषविले होते. त्याच पदावर मुलीची निवड झाल्यामुळे शिवदास कांबळे यांनी आनंद व्यक्त केला.

खास ट्रॅव्हल्स ने आणले सदस्य

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दुपारी २ वा. भाजपा आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खास ट्रॅव्हल्स मधुन जि.प.सदस्य जिल्हा परिषद मध्ये  आणण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील, अर्चना पाटील आदींच्या सुरक्षतेत सदस्य आणण्यात आले.

विकासाचे राजकारण 

जिल्हयाच्या बदलत्या राजकारणा संदर्भात आ. सुजितसिंह ठाकूर यांना विचारले असता आ. ठाकूर यांनी सावंत यांचे आमचे हातमिळवणी करने म्हणजे बदललेले विकासाचे राजकारण आहे, यापुढे ही याच पध्दतीने कारभार होईल, असे सांगितले. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी पण यावेळी चार ही आमदारांचे आभार मानले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: