नरेंद्र मोदींना पवारांचा फोन; महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे मोदींचे आश्वासन

बारामती: महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर सह इतर भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीबाबत महाराष्ट्र व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढतो असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली.

राज्यातील पूरपरिस्थितीबाबत शरद पवार यांनी पंतप्रधानांशी बोलावे अशी विनंती पूरग्रस्त सांगलीतील नागरिकांनी केली होती. त्या नुसार आज पवार यांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन राज्यातील पूर परिस्थितीच्या भीषणतेची माहिती त्यांना दिली. कर्नाटकातील आलमट्टी धरणातून पाच लाख क्यूसेक्सने पाणी सोडणे गरजेचे असताना ते पुरेशा प्रमाणात सोडले जात नाही. पाण्याच्या फुगवट्यामुळे सांगली शहर जिल्ह्यातील तालुक्यांना महापुराचा तडाखा अधिक तीव्रतेने बसला आहे, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एडीयुरप्पा यांच्याशी बोलून मार्ग काढावा अशी विनंती पवार यांनी मोदी यांना केली आहे.

राज्यातील पूरग्रस्तांना केंद्राकडूनही सर्वतोपरी मदतीबाबतही पंतप्रधान सकारात्मक आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही मी या बाबत बोललो असल्याचे पवार यांनी  सांगितले.

कोल्हापूर व सांगलीची परिस्थिती अजूनही फारशी सुधारली नाही. सांगली येथे पलूस नजिक जी दुर्घटना घडली त्या भागाला भेट देण्यासाठी मी उद्या जात असून त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्या पध्दतीने त्यांना मदत करणार असल्याचेही शरद पवार म्हणाले. चाळीस डॉक्टरांची टीम तयार केलेली असून औषध गोळा केली असून ती पूरग्रस्त भागात पाठवणार आहोत, काही प्रमाणात धान्य व कपडे इतरही मदत गोळा केली असून तीही पाठविणार असल्याचे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील मदत पाठवली आहे.

संकटग्रस्तांना मदतीस प्राधान्य…

पूरग्रस्तांना मदत करणे हेच आपले पहिले काम आहे, या परिस्थिती आम्ही कसलेही राजकारण अजिबात करणार नाही, या कठिण प्रसंगी पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे सर्वांचेच काम असून सर्वांनी यात सक्रीय सहभागी व्हावे, असेही आवाहन शरद पवार यांनी केले. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: