धाकधूक वाढवणाऱ्या मतमोजणीत राजेंद्र राऊतच ठरले वरचढ; सोपलांनी पक्ष बदलला तर बार्शीकरांनी आमदार

धाकधूक वाढवणाऱ्या मतमोजणीत राजेंद्र राऊतच ठरले वरचढ; सोपलांनी पक्ष बदलला तर बार्शीकरांनी आमदार

बार्शी: विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीमध्ये बार्शी विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी 95,482 मते घेत त्यांचे पारंपारिक विरोधक शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल (92,406) यांचा 3,076  मतांनी पराभव करुन 10 वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आमदारकी आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांना 16 हजार 119 तर अपक्ष विशाल कळसकर यांच्या रोडरोलरला 11 हजार 427 मते मिळाली. राऊत यांचे चिन्ह व रोडरोलर या चिन्हांमध्ये सार्धम्य असल्यामुळे राऊत यांचा विजय कमी मतांनी झाला

उपळाई रोडवरील शासकीय धान्य गोदामामध्ये सकाळी  8 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप शेलार, अभय कटके यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. एका बाजूला पोस्टल व सैनिक मताची मतमोजणी सुरु होती तर दुसरीकडे 14 टेबलवर ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरु होती. पहिल्या फेरीमध्ये उत्तर बार्शी भागातील उपळाई जिल्हा परिषद गटातील गावांचा समावेश असलेल्या पहिल्या फेरीमध्ये 368 मतांची आघाडी अपक्ष राजेंद्र राऊत यांनी घेतली. ही आघाडी सहाव्या फेरीपर्यंत हळूहळू वाढत जावून ती 4,710 मतांपर्यंत पोहचली होती. सातव्या फेरीला बार्शी शहरातील मतमोजणीला सुरुवात झाली. यात 1,552 मते शिवसेनेचे दिलीप सोपल यांनी जास्त घेतल्याने राऊत यांची आघाडी हळूहळू कमी होवू लागली. संपूर्ण शहराची मतमोजणी होईपर्यंत राऊत यांची आघाडी कमी करुन दिलीप सोपल हे दहाव्या फेरीअखेर 4,869 मतांनी राऊत यांच्यापेक्षा पुढे गेले.

मात्र पुन्हा अकराव्या फेरीपासून  राऊत यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. अकराव्या फेरीत 532 ची आघाडी घेवून सोपल यांचे मताधिक्य कमी करण्यात यश मिळविले. यानंतर राऊत यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही.

प्रत्येक फेरीगणित राऊत यांना 300 ते 500 ची आघाडी मिळत गेली तर सोपल यांची आघाडी कमी होत गेली. मात्र या जोडीला अपक्ष उमेदवार कळसकर यांच्या रोडरोलरलाही प्रत्येक फेरीला 500 मते मिळू लागल्याने दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढू लागली होती. मतमोजणी प्रतिनिधींनाही घाम फुटू लागला आहे. 17 व्या फेरीत राऊत यांनी वैराग भागातील उपळे दुमाला गणातील गावांचा समावेश असलेल्या गावात चांगले मताधिक्य मिळाल्याने तब्बल 1264 मतांची आघाडी घेतली तर 18 व्या फेरीपासून सोपल यांचे मताधिक्य कमी करत त्यांच्यापेक्षा 798 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी शेवटच्या 24 व्या फेरीपर्यंत हळूहळू वाढतच गेली व 24 व्या फेरीअखेर राजेंद्र राऊत हे 93,961 मते घेवून सोपल यांना (91,316) यांच्यापेक्षा  2,645 मतांनी पुढे असल्याचे निश्‍चित झाले व मतमोजणी केंद्रात असलेल्या राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदात उड्या मारण्यास सुरुवात केली व बाहेरही कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु केला. सोपल गटाच्या कार्यकर्त्यांनी हळूहळू मतदान केंद्रातून काढता पाय घेतला. 

सायंकाळपर्यंत पोस्ट मतांची मोजणी सुरु असल्याने विजयाचा नेमका आकडा समजू शकला नाही.  तरीदेखील पोस्टल मतामध्येही राऊत यांनी मतांची आघाडी घेतली आहे.

राऊत कुटुंब तळ ठोकून

मतमोजणी सुरु झाल्यापासून अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत हे मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून होते. याशिवाय बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, अभिजित राऊत, विजय राऊत हे राऊत परिवारातील सदस्य मोजणी केंद्रात आकडेवारी घेण्यात व्यस्त होते

प्रथमच तिसरा उमेदवार ठरला सोपल यांना अडचणीचा

मागील दोन विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांना तिसर्‍या उमेदवाराचा फायदा झाल्याने विजय सोपस्कर गेला होता. यावेळी मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा उमेदवार अडचणीचा ठरला व त्यांना 3 हजार मतांने पराभवाला सामोरे जावे लागले.

खरे मताधिक्य 14 हजार

राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांना 15 हजार 915 मते मिळाली तर राजेंद्र राऊत यांच्या ट्रॅक्टर चिन्हाला सार्धम्य असलेल्या विशाल कळसकर यांच्या रोडरोलरला 11 हजार 427 मते पडली. या दोघांचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांकही एकाखाली एक असल्याने राऊत यांच्या ट्रॅक्टर चिन्हाकडे जाणारी मते रोडरोलरला पडल्याने राऊत यांचे अधिकृत मताधिक्य कमी झाले. अन्यथा राऊत यांचा विजय हा 14 हजार मताने झाला असेच म्हणावे लागेल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: