बार्शी तालुका पाणीदार करणार-नूतन आमदार राजेंद्र राऊत

बार्शी तालुका पाणीदार करणार-नूतन आमदार राजेंद्र राऊत

बार्शीकर जनतेने मला विजयी केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या विरोधकांनी कुटील कारस्थाने करुन आमच्या चिन्हासारखे चिन्ह घेवून रडीचा डाव खेळला. मात्र तो यशस्वी झाला नाही. यापुढे बार्शी तालुक्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहणार आहे.

आम्ही आयुष्यभर जनतेची सेवा करणार असून जनतेला दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण करु. तसेच शहराचाही विकास मी केल्याशिवाय राहणार नाही. शेतकर्‍यांची मान कधी खाली जावू दिली जाणार नाही. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पाणी देवून तालुका पाणीदार करु व यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पोस्ट मतामध्ये दिलीप सोपल यांना 1,090, निरंजन भूमकर यांना 204 तर राजेंद्र राऊत यांना 1,521 मते मिळाली. म्हणजे पोस्टल मतांमध्ये राऊत यांनी 431 मतांची आघाडी घेतली. दिलीप सोपल वगळता उर्वरित सर्व 12 उमेदवारांच्या अनामत रक्कम जप्त झाल्या आहेत.

बार्शी शहरात राजेंद्र राऊत यांना 23,373 दिलीप सोपल यांना 30,061 तर निरंजन भूमकर यांना 2,522 मते मिळाली. म्हणजेच बार्शी शहरात दिलीप सोपल यांना राजेंद्र राऊत यांच्यापेक्षा 6,688 मतांची आघाडी मिळाली.

तालुक्यातील क्रमांक 2 चे शहर असलेल्या भूमकर यांचे गांव असलेल्या वैरागमध्ये भूमकर यांना 4,249 राऊत यांना 3,336 तर सोपल यांना 2,680 मते मिळाली. म्हणजे वैरागमध्येही सोपल यांच्यापेक्षा राऊत यांना 656 मते जास्त मिळाली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: