धाकटी पंढरी धामणगाव येथे फुलला भक्तीचा मळा, लाखों वैष्णवांच्या भक्तीचा सागर ,वाचा सविस्तर

आबा शिंदे

वैराग: धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र धामणगाव ( ता. बार्शी ) येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री. संत माणकोजी बोधले महाराजांच्या संजीवन समाधीचे   लाखों भक्तगणांनी दर्शन घेतले.

श्री. संत माणकोजी बोधले महाराज हे विठ्ठल भक्त होते. त्यांच्या भक्तीप्रेमामुळे आषाढी एकादशीला  पंढरपूर येथून पांडूरंग हे धामणगाव येथे वास्तव्यास येतात. अशी वारकरी सांप्रदायात अख्यायिका मानली जाते. ते आषाढी पौर्णिमेंपर्यत येथेच असतात. त्यामुळे आषाढी एकादशी ते पौर्णिमा या पाच दिवसापर्यंत येथे वैष्णवांचा मेळा भरतो.

फोटो ओळी -आषाढी एकादशी निमित्त धाकटी पंढरी धामणगाव ( ता. बार्शी ) येथील श्री संत माणकोजी बोधले महाराज मंदिर व परिसरात लाखों वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या भक्तीचा सागर लोटलेला दिसत आहे.

‘पंढरीची वाट गेली धामणगावा I
ऐसी सेवा केली बोधल्यांनी ॥ ‘
ही भावना भक्ताच्या मनात असल्याने धामणगाव क्षेत्रास वारकरी संप्रदायात महत्वाचे स्थान आहे. या आषाढीच्या निमित्ताने पंचक्रोशीतील २५ गांवातील पायी दिंड्यासह वारकरी व वैष्णव भक्त येथे लाखोंच्या संख्येने जमले होते. मंदीर हे हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असल्याने वारकरी, भागवत, दत्त पंथात एक वैशिष्ट पूर्ण क्षेत्र म्हणून ख्याती आहे. आषाढी एकादिवशी निमित्त मंदिरात अभिषेक, पुजा, गुरू परंपरा कार्यक्रम होऊन धार्मिक विधीचे कार्यक्रम उत्सहात पार पडले. बोधलेवाड्यातुन पालखी परिक्रमा निघून माणकोजी व विठ्ठलांस नैवैद्य विधी झाला.

-ते भेटी स्थान दुर्लक्षितच... 

पंढरपूर येथे ईशान्य बाजूस श्री. संत माणकोजी बोधले महाराज व पांडुरंग यां गुरु भक्तांच्या भेटीचे स्थान आहे. हे स्थान आम्हास उपलब्ध करुन द्यावे. ते विठ्ठल व बोधले महाराजांच्या भेटीचे स्थान दुर्लक्षीत आहे. ते उपलब्ध करून द्यावे अशी मागणी बालकिर्तनकार ह.भ.प. श्रीराज बोधले महाराज यांनी प्रशासनाकडे केली आहे.

आषाढीनिमित्त परिसर व गावोगावच्या पायी दिंड्या आल्या होत्या. विठ्ठल -बोधनामाचा गजर, भजन, किर्तनात दंग झाल्या होत्या. मंदिर व परिसरात लाखोंचा वैष्णवांचा मेळावा येथे जमला होता. मंदिर व परिसर विद्युत रोषणाईने आकर्षक सजविले होते. याप्रसंगी खेळणे, पाळणे, मनोरंजन कार्यक्रम, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमानी मंदिर परिसर व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. येथील उत्सव आषाढी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. पौर्णिमेच्या पहाटे नाथपंथी जोग, दुपारी कुस्त्यांचा फड, सायंकाळी दहीहंडी कालासोहळ्याने यात्रेची सांगता होणार असल्याचे वंशपिठाधिश ह.भ.प. विवेकानंद बोधले महाराज यांनी सांगितले.

वैराग पोलीस स्टेशनच्या वतीने यात्रा काळात गर्दीच्या सहा ठिकाणी फिक्स पाँईट लावण्यात आले होते. तर राज्य परिवहन महामंडळाच्या बार्शी, कुर्डूवाडी, सोलापूर या आगाराच्या जादा एसटी बसेस वैराग ते धामणगाव असा दिवसभर सुरु होत्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: