‘भारतीय जनता पक्ष उभारणीसाठी माझे खूप मोठे योगदान आहे, तसेच पक्षानेही मला भरभरुन दिले आहे. त्यामुळे मी पक्षावर कधीच नाराज नव्हतो आणि नाही. मात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चौकडीने मला संपविण्याचा प्रयत्न केला’, असा सनसनाटी आरोप भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान शनिशिंगणापुर येथे देव दर्शनासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्य मंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आपली नाराजी कायम असल्याचे दाखवून दिले.
एकनाथ खडसे हे नगर जिल्हा दौर्यावर आले असता त्यांनी शनिवारी सकाळी शनिशिंगणापूर येथे भेट दिली. खडस यांनी कुटुंबीयांसह उदाशी महाराज मठात विधीवत अभिषेक केला. यानंतर चौथर्यावर जाऊन शनिमहाराजांचा तेलाभिषेक केला. मंदीर कार्यालयात सत्कार समारंभ झाल्यानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाजप-शिवसेनेला विधानसभेत बहुमत मिळाले, मात्र दोघेही मागे हटायला तयार नसल्याने सरकार स्थापन होऊ शकले नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीममुळे पक्षाचे नुकसान झाल्याचा आरोप खडसे यांनी केला. तसेच मला अजूनही खूप काही बोलायचे आहे, मात्र योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी बोलणार असे खडसे म्हणाले. यावेळी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते.