दुष्काळ निवारणासाठी माउलींच्या मंदिराकडून पाच लाखाचा निधी

आळंदी- पावसाळा सुरू झाला असला तरी सध्या समाधानकारक पाऊस राज्यात पडलेला नाही. दुष्काळी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे तशीच आहे. या अवर्षणग्रस्तांच्या मदतीसाठी आळंदीच्या संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी आळंदी च्या वतीने पाच लाख रूपयांची मदत राज्य शासनाकडे सुपुर्द करण्यात आली आहे.

मंगळवारी संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याने आळंदीहून पंढरीसाठी प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी माउलींच्या मंदिरात आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाकडे पाच लाख रूपयांचा धनादेश दिला. यावेळी  संस्थान चे विश्‍वस्त अजित कुलकर्णी, अ‍ॅड.विकास ढगे पाटील, अभय टिळक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी श्रीकांत भारतीय उपस्थित होते.

गतवर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने राज्यभर दुष्काळी स्थिती होती. या जून महिन्यात देखील राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. मान्सून अत्यंत उशिरा येथे दाखल झाला आहे. यामुळे आणखी काही दिवस चांगला पाऊस होई तो पर्यंत दुष्काळी स्थिती व पाणीटंचाई भेडसावणार आहे. अनेक मंदिरांनी राज्य शासनाला दुष्काळ निवारणासाठी आर्थिक मदत केली आहे. यात पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, शिर्डीचे साईबाबा संस्थान यांचा समावेश आहे. आळंदीच्या माउलींच्या मंदिराने ही मंगळवारी राज्य सरकारला पाच लाख रूपयांचा धनादेश दुष्काळ निवारणाच्या कामासाठी देवू केला.

पंढरीच्या वारीसाठी व पालख्यांसमवेत चालणारा वारकरी हा शेतकरी असून त्यालाच या दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सहन कराव्या लागत असतात. अशा स्थितीत ही तो पंढरीच्या वारीचा नेम चुकत नाही. संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसमवेत लाखो शेतकरी वारकरी चालत पंढरीकडे आता येत आहेत.

admin: