बार्शीत आज मसाप च्या साहित्य पुरस्काराचे वितरण, छत्रपती शिवाजीराजेंची उपस्थिती

बार्शी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बार्शी शाखेच्यावतीने यंदापासून राजर्षी शाहू साहित्य पुरस्कार देण्यात येत आहेत. टेंभुर्णीच्या विठ्ठलराव शिंदे महाविदयालयाचे प्राचार्य महेंद्र कदम व बोरीभडक (ता.दौंड) येथील कवयित्री कल्पना दुधाळ यांना हा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजे बुधवार दि.२६ जून रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मसापचे बार्शी शाखेचे अध्यक्ष पां.न.निपाणीकर यांनी ही माहिती दिली.

शिवाजी महाविदयालयाच्या नूतन ग्रंथालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज बुधवारी सायं.५ वाजता छत्रपती उदयनराजे भोसले यांचे चुलते शिवरायांचे बारावे वंशज छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

आमदार दिलीप सोपल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. बार्शीतील जेष्ठ साहित्यिक प्राचार्य व.न.इंगळे व विजया इंगळे यांनी बार्शी मसापला एक लाख रूपयांची देणगी दिली होती. ही रक्कम बार्शी मसापचे नावे मुदत ठेवीत गुंतवून त्यावर वर्षाकाठी मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी दोन साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.

त्यामुळे शहर व परिसरातील नव्या-जुन्या साहित्यिकांच्या कसदार साहित्य निर्मितीला चालना मिळू शकेल अशी अपेक्षा इंगळे यांनी देणगी देताना व्यक्त केली होती. त्यानुसार बार्शी मसापतर्फे हे पुरस्कार यंदापासून सुरू करण्यात आले आहेत.या कार्यक्रमाचा बार्शीकर रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक जुगलकिशोर तिवाडी व प्रा. डॉ रविराज फुरडे यांनी केले आहे.

admin: