थोरात स्वतःच भाजप प्रवेश करणार होते, विखे पाटलांचं खळबळजनक वक्तव्य

अहमदनगर । बाळासाहेब थोरात हे स्वतः भाजपात प्रवेश करणार होते, असं खळबळजनक वक्तव्य राधाकृष्ण विखे यांनी केलं आहे. थोरातांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असल्याची घणाघाती टिकाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यावर थोरातांनी ” दिल्या घरी सुखी रहा ” असा सल्ला विखेंना दिला होता. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा तुम्ही करू नका असा सल्ला थोरातांना दिला. तसेच थोरातच काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश करणार होते, असा खळबळजनक खुलासा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

थोरात कुणाकुणाला भेटले होते, याची सगळी माहीती माझ्याकडे असल्याचं वक्तव्य विखे पाटलांनी केलं. बाळासाहेब थोरातांचे स्वतःचे कर्तृत्व काही नसुन, मी विरोधी पक्षनेता असताना काम केल्यानेच आज काँग्रेसला अच्छे दिन आल्याचं देखील विखे पाटलांनी म्हटलंय. बाळासाहेब थोरात यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असल्याची घणाघाती टिकाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर केली.

एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध सुरू झाल्याने, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आणि यात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: