तुमचं आहे तुम्हीच घेऊन जावा… वाचा-आमदार सोपलांनी सांगितलेली कथा नेमकी काय आहे ते

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप सोपल यांनी परवा आगामी राजकारणाची दिशा काय असावी हे जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये बोलताना त्यांनी मिश्किल शैलीत राजकारणी नेतेमंडळी सातत्याने मी केले मी केले असे सातत्याने सांगत कित्येक कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतात.. यामध्ये कितीतरी न केलेल्या कामांची ही यादी असते.. याला स्थानिक राजकारणाची जोड देत त्यांनी सर्व काही तुमचे म्हणजे जनतेचे आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत, आम्ही तुमचेच तुम्हाला देत आहोत हे सांगताना महाभारतातील अर्जुन-श्रीकृष्ण आणि कर्ण यांची दानाची कथा सांगितली ती कथा नेमकी काय आहे हे वाचा

दान निरपेक्ष असलं पाहिजे

ज्यांनी ज्यांनी पूरग्रस्तांना मदत करताना सेल्फी काढली व ती एफबी, व्हाट्सअप्प इंस्टाग्राम वर अपलोड केली त्यांच्यासाठी ही गोष्ट-

एकदा श्रीकृष्णाने त्याच्या समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला…

हे सगळे सोने गावकरयांमध्ये वाटून टाक पण
अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.

लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की मी प्रत्येक गावकरयांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.

लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.

पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.

मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.

दिवस रात्र काम चालू होते.

अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.

पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.

लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.

आता अर्जून अगदी दमून गेला होता.

पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.

शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास….!
आता यापुढे मी काम करू शकत नाही.

मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की…….

या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या…

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकरयांना बोलवले आणि सांगितले,
या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत.

एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.

लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही? तो भयंकर अस्वस्थ झाला.
कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला…

अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास…..!

तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास.

जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास..!

कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.

त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

थोडक्यात म्हणजे देणगीच्या बदल्यात, मदत केलेल्याच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, शाबासकी द्यावी, धन्यवाद द्यावेत, अशी अपेक्षा ठेवणे हे कधीच निरपेक्ष दान नसते. अशावेळी तुम्ही जिंकून देखील हरलेले असता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: