तरच आय.पी.एल. खेळवा,क्रीडा मंत्रालयाचे बी.सी.सी.आय.ला आदेश.

तरच आय.पी.एल. खेळवा,क्रीडा मंत्रालयाचे बी.सी.सी.आय.ला आदेश..

नवी दिल्ली : भारतामध्येही कोरोना व्हायरसने प्रवेश केल्यामुळे जगातली सगळ्यात मोठी टी-२० लीग असलेली आय.पी.एल. संकटात सापडली आहे. त्यातच आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आय.पी.एल.बाबत बी.सी.सी.आय.ला महत्त्वाची सूचना केली आहे.

देशामध्ये कोणत्याही स्पर्धेचं आयोजन करायचं असेल, तर ते बंद दाराआड करा, असं क्रीडा मंत्रालयाने सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर बी.सी.सी.आय.ला आय.पी.एल.चं आयोजन करायचं असेल, तर स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय मॅचचं आयोजन करावं लागेल.

स्पर्धा बंद दरवाजाआड कराव्यात आणि प्रेक्षक हे सामने पाहायला येऊ नयेत याची काळजी घ्यावी, असं क्रीडा सचिव राध्येशाम जुलानिया यांनी आय.ए.एन.एस. या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

क्रीडा सचिव राध्येशाम जुलानिया म्हणाले, ‘बी.सी.सी.आय.सह सगळ्याच राष्ट्रीय संघांना आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचना, नियम आणि सल्ल्याचं पालन करायला सांगितलं आहे. सार्वजनिक सभांपासून जपण्याचा सल्लाही आम्ही दिला आहे. जर एखाद्या स्पर्धेचं आयोजन करायचं असेल, तर मोकळ्या स्टेडियममध्ये करा.

पण यासाठी बी.सी.सी.आय.ला राज्य सरकारचीही परवानगी घ्यावी लागणार आहे.’ बी.सी.सी.आय.च्या अधिकाऱ्यानेही केंद्र सरकारच्या या आदेशावर भाष्य केलं आहे. ‘बी.सी.सी.आय. खेळ, खेळाडू, प्रेक्षक आणि लीगचं हीत लक्षात घेऊन योग्य पाऊल उचलेल. परिस्थिती जलद बदलत आहे आणि बोर्डाचं यावर नियंत्रण नाही.

आय.पी.एल. कार्यकारी परिषदेची बैठक शनिवारी मुंबईमध्ये होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारने दिलेला आदेश लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल,’ असं बी.सी.सी.आय. अधिकारी आय.ए.एन.एस.शी बोलताना म्हणाला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: