ज्याचं जळत त्यालाच कळतं… लोक फक्त तोंडसुख घेतात

केतकी व सुजाता यांचं बोलणं चाललं होत… केतकी खूप भडकलेली होती… . केतकीला शांत बसायला लावलं सुजाताने…पाणी दिल प्यायला आणि
“सांग काय झालं केतकी ”

  • आजचा माझा दिवसच खराब होता. सकाळी पासून काही न काही उलटंच होत आहे.. बसस्टँड वर गेले तर तिथे बस वेळेत मिळाली नाही.. ऑफिसला जायला उशीर झाला.. म्हणून बॉस रागावला..

“अशी खोटी कारण सांगायची असेल तर नोकरीं सोडून घरी बसा ” असं बॉस म्हणाला. यांना का आपली कोणतीच गोष्ट खरी नाही वाटत ग?

बॉस बोलला ते सर्व स्टाफ समोर… त्यातही माझ्या ऑफिस मधे लेडीज स्टाफ जास्त आहे… जे काही मोजके जेन्टस आहे तेही आजकाल बायकांच्या गॉसिप मधे सहभागी होत आहे.

एका स्त्रीने तरी दुसऱ्या स्त्रीच मन समजलं पाहिजे तर नाही…त्या जास्तच वार करतात… आणि जखमेवरच्या खपल्या देखील काढतात.. ती निधी माहिती आहे न तुला.. जरा जास्तच शहाणी समजते स्वतःला..

निधी म्हणते कशी “आम्ही देखील बसनेच येतो बर का.. घरी नवऱ्याचा व माझा डबा, घरची सर्व काम करून… एकट्या बायांना काय माहिती कोणते काम असतात घरी? नवरा तर कधीचाच सोडला… की त्यांनी हिला सोडल अशा लेटलतीफ पणामुळे..? लग्न झालेली बाई सर्व आवरून वेळेत पोहचते ऑफिसला मग हिला काय होत? “

त्यावर ती लतिका म्हणते “मला तर सासू -सासरे यांचं देखील करून यावं लागत तरी मी उशीर होऊ देत नाही.. हिला घर ना परिवार कशात बिझी असते माहिती नाही “

त्यावर तो अतिशहाणा विराज हलक्या आवाजात म्हणाला… ” मेकअप ” बस इतकंच बोलला तो त्याला वाटलं मला ऐकायला नाही आलं….

त्याला पूर्ण सुरभीने केल.. “आपल्याला मेकअप ला वेळ नाही लागत ग.. आपण फॅमिली वाल्या. आपल्याला कुणाला इम्प्रेस करायला जास्तीचा मेकअप नाही करावा लागत..” सगळे हसायला लागले ग सुजाता.

यांना काय माहिती आहे माझ्या भूतकाळाविषयी यांना इतकंच कळतं की मला नवऱ्याने सोडलंय .. मला मुलबाळ नाहीत, फॅमिली नाही त्यामुळे मला घरच्या कामाचा व्याप नाही.. पण माझ दुःख, माझ मन जाणण्याचा प्रयत्न केला का कुणी..

मी मेकअप करते तें काय मला नवरा नाही म्हणून इतर पुरुषांना रिझवण्यासाठी नाही.. तर मला आवडतं तस राहायला.. माझ्या पेहराव्यावर.. राहणीमानावर, मेकअप वर बोलण्याचा अधिकार कुणी दिला यांना.. ??

जर पुरुष माझ्याकडे बघून लाळ गळतात त्यात माझा दोष आहे की त्या पुरुषांच्या नजरेचा..?

माझा नवरा मला अंधारात ठेऊन… बाहेर अफेर करत होता… मला आई व्हायचं होत पण त्यामुळे घरी त्याला तें शारीरिकसुख मिळालं नसत म्हणून त्याने “अग अजून आपले एन्जॉय करायचे दिवस आहेत कुठे मुलाची बेडी अडकवतेस पायात व आपल्या दोघात ” असं म्हणून मला गप्प केल. घरी सगळ्यांचं करायच.. त्यासाठी जॉब सुद्धा सोडला मी.. कॉम्प्रमाइज केल.

दोन वर्ष झालीत मुल होत नाही म्हणून वांझोटी च लेबल माझ्या मस्तकी लागल.  माझ्या नवऱ्याला कुणीच नाही बोललं या वीषयी.. सगळा दोष माझाच होता का? 

जेव्हा मला नवऱ्याचं बाहेरच अफेअर कळलं तेंव्हा तर पायाखालची जमीन सरकली माझ्या..

काय कमी होत माझ्यात.. त्याला एकदम टापटीप मुली आवडायच्या… घरी राहून सिरीयलमधल्या नट्यान सारखी मेकअप थोपवून राहायचं होत का मी. आणि काम कुणी केली असती त्याच्या आईने का?,

घरच करून टापटीप राहणं जमत नव्हतं मला..
म्हणे “तू अधिसारखी टापटीप राहत नाहीस…” बाहेर लफडी केली त्याने पैसे खर्च करून… आणि घरी आल्यावर माझ शरीर होतच लचके तोडायला… या अफेअर विषयी बोलले तर मलाच दोष दिला सगळ्यांनी .. की “मी नवऱ्याची मर्जी राखत नाही. म्हणून माझा नवरा दुसरीकडे जातो ” म्हणजे यातही दोष माझाच का?

कसा? सांगेल का कुणी मला?

थकले होते मी या सगळ्याला.. चांगल शिक्षण होत माझ्याकडे हे असं उपर जीवन जगल्या पेक्षा मला एकटं राहणं जास्त योग्य वाटलं.. म्हणून मी वेगळी झाले.. आई -वडिलांवर व भावाच्या संसारावर आपली सावली नको म्हणून इथे दूर येउन राहतेय स्वबळावर मिळवलेल्या नोकरीवर स्वतःच पोट भरतेय..

शारीरिक गरज तर कधीचीच संपली ग माझी…

पण हौसमौज करून, आनंदी राहावं सुखाने आयुष्य जगाव.. आपणही नीटनेटकं राहावं असं वाटत. तस राहील तरीदेखील माझ्यावरच दोष… का?

सुख माझ्या नशिबातच नाही का? कामाचं टेन्शन नाही म्हणे मला घरच्या.. अग सगळं सांभाळायची मी.. नोकरीं सोडली त्यासाठीच. बाळ हवं होत मला मी जबाबदारी घ्यायला तयार होते बाळाची पण माझा नवरा.. त्याला दोघात तिसरं नको होत.. आणि कदाचित मला बाळ झालं असत तर आज मी इथे नाही त्याच घरात तसंच उपर जीवन जगत असते.

एका स्त्रीला अधिकार नाही का एकटं स्वतंत्र जीवन जगण्याचा..?

का पुरुषाची ढाल हवी असते तिला तिच पावित्र्य सिद्ध करायला? ….

बायको घरी असूनही नवरा बाहेर अफेअर करतो तो चांगला व त्याची बायको म्हणून त्याचा त्रास सहन करणारी पत्नी चांगली.. पण तिच पत्नी विभक्त झाली तर

“तिचे चालचलण ठीक नाही, ती दुसऱ्या पुरुषांना रिझवते, तिला काही काम नसतात, रिकामटेकडी असते ती, टेन्शन नसत एकट्या बाईला.. “

खरच किती घाणरेडा हा समाज व या समाजातिल लोकांची विचारसरणी. स्त्रीने फक्त सहन करायच व पुरुषांच्या आधाराने जगायचं. एकटी स्त्री ही नेहमी उपहासाचे माध्यम असते सगळ्यांसाठी..

आता काय सगळ्यांना माझी कहाणी सांगून.. त्यांच सांत्वन मिळवू का मी? मला नाही आवडत अशी अबला बनून… सहानुभूती मिळवलेली. लोक का नाही समजूंन घेत एकट्या स्त्रीला ही आत्मसन्मान असतो.. यांच्या अशा टोमण्या मुळे तिची हिम्मत खचते..

मी खूप कणखर आहे ग सुजाता पण कुठेतरी.. खोल कप्प्यात दडलेल मन.. हळवं मन बाहेर येत व त्या मनावर झालेल्या जखमेवरच्या खपल्या मग अशा बोलण्याने निघतात.. आणि तें रक्तबंबाळ मन….. मग रुदन करत ग आतल्या आत..

तें कुणालाच दिसत नाही.. मेकअप नी रंगवलेल्या चेहऱ्या आड व स्मितहास्य आड सगळं लपून जातं आणि लोकांना दिसते ती एकटी.. स्त्री… लचके तोडण्यासाठी…

अतिशय रागाने केतकी बोलत होती.. क्षणाचाही उसंत न घेता… ती सगळं पटापटा बोलत होती वसुजाता तिच ऐकून घेत होती….

सुजाता :- केतकी झालं का तुझं बोलून… मन शांत कर आधी. आणि ऐक मी काय म्हणतेय.. तुला सगळं माहिती आहे न… समाज कसा आहे व तो तुझ्या… माझ्याने बदलणार देखील नाही.. हे मान्य कर तू.. तुला मानावच लागेल.

पुरुषांच्या नावाचा आधार न लावणाऱ्या आपल्या सारख्या स्त्रियांच्या नशिबी हेच भोग आहेत.. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देउ नकोस…

एक म्हण आहे….”ज्याचं जळत त्यालाच कळत” बाकीचे म्हणजे तुझ्या नजरेतील समाज हा फक्त तोंड सुख घेतो… असं बोलणाऱ्यांच्या बहिणी व मुलीवर किंवा त्या स्त्रिया असतील स्वतः तर त्यांच्यावर अशी वेळ येईल तेंव्हा त्यांना आपल दुःख कळेल..

पण मी देवाजवळ प्रार्थना करेल अशी वेळ कुणावरही न येवो.

तू स्वतःला त्रास करून नको घेऊ..

समाप्त……

जयश्री कन्हेरे -सातपुते..

टीप.. या लेखाचा माझ्या वयक्तिक जीवनाशी काही एक संबंध नाही.

ग्लोबल न्युज नेटवर्क: