मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र स्वबळावर सत्ता स्थापन करण्याएवढ्या जागा त्यांना मिळालेल्या नाहीत. यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा भाजपला आवश्यक आहे. खरंतर शिवसेनेला जागा कमी मिळाल्या आहेत. मात्र सेनेची ताकत वाढलेली आहे. भाजप बहुमतापासून दूर असल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवावं अशी मागणी सुरु केली आहे. यात आता काँग्रेसकडून देखील आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रह केला जात आहे आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना ‘संधी सोडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही’ असा सल्ला दिला आहे. तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहित हा सल्ला दिला आहे.
सत्यजित तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले की, 2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी ‘अध्यक्ष’ व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले. मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, ‘सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल’. पुढे सर्व जिल्हा मला ‘भावी अध्यक्ष’ म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या. पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला. हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती. असा सल्ला सत्यजित तांबेंनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi