जाणून घ्या पालखी सोहळ्याचा इतिहास

ग्लोबल न्यूज मराठी-  यंदा १२ जुलै रोजी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह देश-विदेशातून लाखो भाविक येतात. अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे २५ जून तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे २४ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होत असतात. पण अनेकांना हा पालखी सोहळा कधी सुरु झाला, कोणी सुरु केला हे माहिती नाही. चला तर मग जाणून घेऊया पालखी सोहळ्याचा इतिहास…

संत ज्ञानेश्वर महाराज ते संत तुकाराम महाराज, तेरावे शतक ते सतरावे शतक अशी ४०० वर्षे आपल्याला वारकरी दिंडयांची परंपरा दिसून येते. संत तुकाराम महाराज यांच्यानंतर त्यांचे बंधू कान्होबा व पुत्र नारायण महाराज यांनी पुढे ‘पंढरीची वारी’ करून घराण्याची परंपरा निष्ठेने व भक्तिभावाने सांभाळली. नारायण महाराज यांनी पहिली वारी १६८५ साली केली. त्यांनी पुढे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका घेऊन त्या पालखीत ठेवून रथासह पंढरीची वारी सुरू केली. या पालखी सोबत अनेक दिंडया सहभागी झाल्या व त्याला पालखी सोहळयाचे स्वरूप प्राप्त झाले. अलीकडच्या काळातील पालखी सोहळयाचा हा शुभारंभ होय.

सध्या आपण पाहतो तो आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला, ते हरिभक्तिपरायण हैबतबाबा आरफळकर (आरफळ, सातारा). हे प्रारंभी संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांच्या सोबत पंढरपूरची वारी करीत होते. मात्र, काही कारणामुळे हैबतबाबा यांनी १८३२ सालापासून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरु केला.

आळंदीकर वारकरी, खंडुजीबाबा आणि वासकर महाराज यांनी भजनादी कार्याची जबाबदारी घेतली व अंकली (बेळगाव)चे शितोळे सरकार यांनी पालखीसाठी लवाजमा दिला, प्रसादाची व्यवस्था केली. आताही ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात शितोळे सरकार यांचा अश्व असतो. अशा प्रकारे आळंदी-पंढरपूर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचा उपक्रम प्रारंभ झाला.

सध्या महाराष्ट्राच्या कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा सर्व कानाकोपऱ्यांतून अनेक संतांच्या नावे अनेक पालख्या आषाढी वारीस पंढरपूरला येतात. या पालख्यांची संख्या नेहमी वाढत जाते. सध्या २५० ते ३०० पालख्या येतात. या पालख्यांसोबत एकूण सुमारे ४ ते ५ लाख वारकरी पायी पंढरपूरला येत असतात.

ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच शेअर करा….

धिरज करळे: