जाणून घ्या केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजकीय प्रवास

एएम न्यूज नेटवर्क | शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. गिरणी कामगाराचा मुलगा ते थेट केंद्रीय मंत्री असा खडतर आणि संघर्षमय प्रवास अरविंद सावंत यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची वर्णी लागली आणि शिवडीचा भूमिपुत्र, एका गिरणी कामगारांचा मुलगा, मंत्रिमंडळात गेला अशी चर्चा मतदार संघात सुरू झाली. शिवसेनेत तीन ते चार वेळा खासदारकी भूषवलेले खासदार असताना देखील अरविंद सावंत यांना मात्र दुसऱ्याच टर्ममध्ये मंत्रीपद मिळाले. पण हा प्रवास काही सोप्पा नव्हता. शिवसेनेचे प्रवक्ते असलेल्या अरविंद सावंत यांची अभ्यासू, हुशार नेत्यांमध्ये गणना होते. केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा सावंत यांचा प्रवास संघर्षमय आहे. शिक्षक, कामगार नेते आणि आता केंद्रीय मंत्री असा सावंत यांचा प्रवास आहे.

अरविंद सावंत यांचा थोडक्यात प्रवास

– 1968 साली शिवसेना गटप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली.

– 1969 साली सीमा आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

– एमटीएनएलमध्ये कामगार संघाचे ते तीस वर्षं अध्यक्ष होते.

– महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर 1996 मध्ये सावंत यांची विधानपरिषदेवर निवड.

– 2010 मध्येही विधानपरिषदेचे ते आमदार होते.

– एक अभ्यासू आमदार म्हणून अरविंद सावंत यांची ओळख आहे.

– 2014 मध्ये लोकसभेसाठी त्यांना प्रमोशन मिळालं.

– 2019 मध्येही त्यांचा दणदणीत विजय झाला.

– ‘युनो’त आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली.

काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा अरविंद सावंत यांनी पराभव केला

शिवसेनेत गटनेत्यापासून विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. आमदार-खासदार आणि आता मंत्रीपदापर्यंत पोहोचणारे अरविंद सावंत अत्यंत अभ्यासू, कष्टाळू आणि हुशार नेते म्हणून ओळखले जातात. 2014 पासून दक्षिण मुंबई मतदार संघामध्ये केलेले काम पाहून पुन्हा एकदा जनतेने त्यांना निवडून दिले. राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा अरविंद सावंत यांनी पराभव केला. निवडणुकीच्या अगोदर आलेल्या एक्सिट पोल मध्ये आणि विविध संस्थानी केलेल्या सर्वेत सुद्धा अरविंद सावंत यांचा पराभव होणार असे सांगितले होते. पण अरविंद सावंत यांनी हे सगळे अंदाज खोटे ठरवत फक्त खासदरकीच नाही तर थेट मंत्रिपद मिळवले.

कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या अरविंद सावंत यांनी मोदींच्या मंत्री मंडळात स्थान तर मिळवले. खासदार असताना त्यांनी मुंबईकरांचे अनेक प्रश्न संसदेत मांडले पण आता मंत्री झाल्यानंतर हेच प्रश्न ते मार्गी लावणार का…? हे पाहणे महत्वाचे ठरनार आहे.

admin: