जाणून घ्या कशी असते पालखी सोहळ्याची रचना

थोड्याफार फरकाने सर्व पालखी सोहळ्यामध्ये चालताना पुढील क्रमाने चालतात.

नगारा –अश्व १ – अश्व -२ – दिंडी क्र. ११ रथापुढे – दिंडी क्र.१० रथापुढे — — — –दिंडी क्र.१ रथापुढे – रथ व पालखी – दिंडी क्र.१ रथामागे – दिंडी क्र. २ रथामागे —-

ही रचना ज्ञानेश्वर माउली व तुकोबांच्या पालखी सोहळ्याची आहे. सर्व सोहळ्यांमध्ये नगारा गाडी, अश्व वगैरे लवाजमा नसतो.

नगाऱ्याची गाडी 
सर्वात पुढे नगाऱ्याची बैलगाडी / छकडा असतो , आजकाल आधुनिक पद्धतीचा रथ सुद्धा असतो . या गाडीमध्ये नगारा व नगारा वादक बसतात. प्रवास सुरु असताना अखंड नगारा वादन चालू असते.

घोडे 
त्यानंतर नगाऱ्यामागे दोन अश्व असतात. एक अश्व मोकळा असतो. या अश्वावर कोणी बसत नाही. त्या अश्वावर संत बसतात अशी श्रद्धा आहे . दुसऱ्या अश्वावर जरीपटका घेतलेला मराठमोळ्या वेशातील स्वार असतो.

दिंडी 
अश्वांच्या मागे दिंड्या सुरु होतात . मध्यभागी रथामध्ये पालखी व यापुढे रथापुढील दिंड्या व मागे रथामागील दिंड्या अशी रचना असते . अलीकडे दिंड्यांची संख्या वाढल्याने रथामागील दिंड्यांची संख्या अधिक झाली आहे. माउलींच्या सोहळ्यात रथापुढे २७ तर रथामागे दोनशेहून अधिक दिंड्या आहेत.

घोड्यामागे रथापुढील दिंडी क्र. २७, त्यानंतर रथापुढील दिंडी क्र. २६, शेवटी रथापुढील दिंडी क्र. १ व त्यानंतर रथ. रथाच्या मागे रथामागील दिंडी क्र. १ त्यांनतर रथामागील दिंडी क्र.२ अशाप्रकारे दिंड्या चालतात.

पालखी रथ 

दिंड्यांच्या मध्ये रथ व रथामध्ये पालखी ठेवलेली असते . रथ ओढण्यासाठी बैलजोडीचा वापर करतात . पालखी सोहळ्याला सुरवात झाली तेव्हा पादुका डोक्यावर घेऊन , गळ्यात बांधून अथवा पालखीत ठेवून खांद्यावरून पालखी वाहून नेत. त्यानंतर बैलगाडी वर लाकडी फळ्या टाकून त्यावर पालखी ठेवत . त्यानंतर लाकडी रथ आले . विविध संस्थानचे वेग वेगळ्या आकाराचे लाकडी रथ होते . पुढे आळंदी देवस्थानचे अनुकरण करून बहुतेक रथ त्याप्रमाणे केले आहेत .

मोठ्या संस्थानचे रथ चांदीने मढवलेले आहेत तर अन्य संस्थानांनी जर्मन सिल्व्हर पत्र्याचा वापर केला आहे. रथ थांबवण्यासाठी काही रथांना आता आधुनिक प्रकारचे ब्रेक लावले आहेत. त्यामुळे उतारावर रथ चालवताना सोयीचे होते. 
पूर्वी रथाला मुख्य दिवशी आंब्याचे टहाळे , नारळाच्या झावळ्या , केळीचे खांब लावत . आता विविध देशी विदेशी फुलांचा वापर करून सजावट केली जाते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: