जागावाटपाचे मी, मुख्यमंत्री आणि अमित शहा ठरवू! उद्धव ठाकरे ,आणखी एक आमदार शिवसेनेत

मुंबई: जागावाटपाचा अधिकार मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आहे. तेव्हा जागावाटपाचे काय करायचे ते आम्ही ठरवू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप नेत्यांना फटकारले.

आगामी विधानसभा निवडणुकीत युतीसाठी फिफ्टी–फिफ्टी फार्म्युला कठीण असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी नागपूर येथे केले होते. मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले, शिवसेना–भाजप एकत्रच आहेत. आम्ही निवडणुकाही  एकत्रच लढविणार आहोत. जागावाटपाचे अधिकार मी, मुख्यमंत्री आणि अमित शहांना आहेत.

आमच्याकडे वॉशिंग पावडर नाही!

शिवसेनेतील प्रवेशांविषयी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्याकडे कुठलीही वॉशिंग पावडरही नाही. आमच्याकडे आहे ती शिवसैनिकांची जिद्द, हिंमत. आम्ही कुणाला फोडायला गेलेलो नाही. मात्र शिवसेनेची जी वाटचाल चाललेली आहे. ते शिवसेनेचे काम भावल्यानंतर अनेकजण शिवसेनेत येत आहेत.

भास्कर जाधवही ‘मातोश्री’वर

राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनीही आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी  भेट घेतली. या भेटीचा संदर्भ देत राष्ट्रवादीतील लोक भगवा झेंडा घेऊन येत आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता भगवा हातात नव्हे तर हृदयात असावा लागतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार विलास तरे शिवसेनेत

बोईसरमधील बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून तसेच भगवा झेंडा देऊन तरे यांचे स्वागत केले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावेळी शिवसेना नेते व ठाणे जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राजेश शहा आदी उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: