झालं फायनल:राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल 28 ऑगस्टला करणार शिवसेनेत प्रवेश

गणेश भोळे

ग्लोबल न्यूज मराठी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार दिलीप सोपल हे 28 ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्षप्रवेश होणार असल्याची घोषणा स्वतः आमदार सोपल यांनी बार्शीत पत्रकार परिषदेत केली आहे.

दिलीप सोपल निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस होती. त्याअनुषंगाने त्यांनी मागील आठवड्यात बार्शीत निर्धार मेळावे घेऊन आठ दिवसांची वेळ मागून घेतली होती.आज सोपल यांचा पक्षप्रवेशाची तारीख फायनल झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप सोपल यांना ओळखलं जातं. आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री व मंत्री म्हणून विविध मंत्रीपदांवर काम केले आहे.

गेल्या महिनाभरापासून सोपल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर तीनवेळा मुहूर्त टळल्यानंतर आता त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोपल राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याने सोलापूर जिल्ह्यात पक्षाला धक्का मानला जात आहे. या प्रवेशाच्या निर्णयापूर्वी सोपल यांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या शी चर्चा केली होती.

बार्शी विधानसभेची जागा युतीच्या जागा वाटपात ही शिवसेनेकडे आहे. मागील वेळेस माजी आमदार राजेंद्र राऊत हे सेनेकडून तर राजेंद्र मिरगणे हे भाजपा कडून लढले होते यात सोपल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते.विधानसभेनंतर राऊत हे काही वर्षांनी भाजपात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून यश मिळवले.

आता एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले राऊत व सोपल आणि राजेंद्र मिरगणे हे तिन्ही नेते सत्ताधारी पक्षात आले आहेत. बार्शीत विधानसभा निवडणुकीत बार्शीची जागा सेनेकडे असल्याने व सोपल हे विद्यमान आमदार असल्याने तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी परवा दोन्ही पक्ष्याकडे असलेल्या विद्यमान आमदारांना जागा जाणार आहेत असे सांगितल्या प्रमाणे युतीच्या जागा वाटप्पात ही जागा सेनेकडे राहणार हे जवळजवळ निश्चित आहे.त्यामुळे माजी आमदार राजेंद्र राऊत हे अपक्ष की अन्य पक्षा कडून लढणार हे लवकरच समजणार आहे.

आमदार दिलीप सोपल यांची राजकीय कारकीर्द

1985 साली शरद पवार यांच्या तत्कालीन समाजवादी काँग्रेसपक्षातून आमदार

1990 काँग्रेस, 1995 अपक्ष, 1999 राष्ट्रवादी काँग्रेस, 2009 अपक्ष, 2014 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी.

सलग सहावेळा वेगवेगळ्या चिन्हावर आमदार

1995 साली युती सरकारमध्ये विधी व न्याय राज्यमंत्री

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये सुरुवातीला महसूल राज्यमंत्री व नंतर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री पद

महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषद अध्यक्ष
राज्य वखार महामंडळ संचालक

पंचायत राज समिती अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संचालक

महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन अध्यक्ष

विधानसभेच्या इतर मागास वर्ग समितीचे अध्यक्ष

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदी राज्य पातळीवरील विविध प्रकारची महत्वाची पदे भूषवली आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: