जयंती विशेष लेख: जगातला सर्वोत्तम पुत्र किर्तीवंत छत्रपती संभाजी महाराज !

जयंती विशेष लेख: जगातला सर्वोत्तम पुत्र किर्तीवंत छत्रपती संभाजी महाराज !

जयंती विशेष लेख 14 मे 2020

           महापराक्रमी,कर्तृत्वान माणसांच्या बाबतीत तुकाराम महाराज एका अभंगात असं म्हणतात,

न लगे चंदना सांगावा परिमळ|
वनस्पतिमेळ हाकारूनी ||
अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी |
धरिता ही परी आवरे ना ||

आपल्याकडं सुगंध आहे, हे वनस्पतींचा मेळावा भरवून चंदनाला जाहीर करावं लागत नाही.त्याचा सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत असतो.जे अंतर्यामी असतं, ते कृतीतून धावतं.स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिझवणारया स्वराज्य रक्षक,ज्ञानवंत, प्रज्ञावंत किर्तीवंत,शिलवंत,संस्कृत पंडीत छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज ३६३ वी जयंती आहे. त्या निमीत्ताने त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करीत आहे.
१४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा ‘संभाजी’ नामक महापराक्रमी, जगातला सर्वोत्तम पुत्र,जन्माला आला.शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही.

चंद्रकोरीप्रमाणे लहानग्या संभाजी राजांच्या लीला वाढत होत्या. पण आपल्या पुत्राची वैभवशाली कारकीर्द कर्तबगार महाराणी सईबाईंना पाहता आली नाही आजाराने त्यांचे १६५९ मध्ये दुःखद निधन झाले. तेव्हा युवराज संभाजीराजे अवघे दोन वर्षांचे होते जन्मदात्या आईचे छत्र जरी हरवले असले तरी राष्ट्रमाता, राजमाता माॅसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्र छायेखाली युवराज संभाजी राजे तयार होत होते.

आपल्या पुत्राने स्वराज्याची गौरव पताका यशस्वीपणे पुढे न्यावी, या हेतूने युवराज संभाजींना लहानपणापासूनच शिवाजी महाराजांनी भावी छत्रपती म्हणून त्यांना घडवण्यास सुरुवात केली होती.शिवाजी महाराज एखाद्या मोहिमेला निघाले, की सोबत संभाजी राजांना आवर्जून नेत असत. तसेच स्वत:हून सैन्याची छोटीशी तुकडी पाठवून संभाजी राजांना त्या तुकडीचे नेतृत्व करायला सांगत.संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून संस्कृत पंडीत झाले.त्या नंतर नखशिख, नायिकाभेद,सातशतक हे ग्रंथ ब्रज भाषेत लिहुन लेखनाची मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली.

शिवाजी महाराज राज्यकारभाराची प्रत्येक बाब त्यांच्या मनावर बिंबवत होते.त्याच दरम्यान संभाजी राजांना त्यांच्या जीवनातील सर्वात पहिल्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले.औरंगजेबासोबतच्या आग्रा भेटीचा तो क्षण!महाराजांनी विश्वासाने औरंगजेबाचं आमंत्रण स्वीकारले. सोबत गेलेले संभाजी महाराज वयाने लहान असूनही न डगमगता धिटाईने औरंगजेबाला सामोरे गेले.तेव्हा औरंगजेबाला वाटलेही नसेल की हाच शिवपुत्र पुढे जाऊन आपलं जगणं असाहाय्य करणार आहे.

आग्र्यात बंदी असताना शत्रूच्या गोटात राहून संभाजी राजांना अनेक गोष्टी शिकता आल्या.पुढे आग्रातून निसटणं, वेषांतर करून दीर्घकाळ स्वराज्यापासून दूर राहणं,नानाविध प्रदेशांचा आणि परिस्थितींचा अनुभव घेणे या सर्व घटनांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला.आणि भावी छत्रपती म्हणून स्वराज्यासाठी हे सर्व कष्ट सहन करण्याला ते आपले कर्तव्य मानू लागले.

१६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या ऍबे कँरे नावाच्या एका फ्रेंच प्रवाश्यांने संभाजी महाराजांचे केलेलं वर्णन त्यांच्यातील कुशल राज्यकर्त्याची पावती देण्यास पुरेसे आहे. ते म्हणतात,

“हा युवराज लहान आहे, तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजी महाराजा सारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे.”

“तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे.”

“सैनिकांचे त्यांच्यावर फार प्रेम आहे व ते त्यांना शिवाजी महाराजा सारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीराजेंच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते.”

केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी असलेली छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आस त्यांच्या मनात रुजू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी छोट्या परंतु अनेक यशस्वी मोहिमा हाताळल्या आणि यशस्वी देखील करून दाखवल्या.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्यावर आणि स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीमध्ये रडत न बसता संभाजी राजांनी स्वत:ला सावरले आणि स्वराज्याचा डोलारा हाती घेतला.

१६ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.आता ते छत्रपती झाले होते. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्वच बाबींमध्ये आपले कौशल्य दाखवून देत त्यांनी अल्पावधीतच रयतेचे आणि स्वराज्याचे मन जिंकून घेतले.संभाजी महाराजांना जाणून घेताना ते गादीवर बसल्यापासून पुढचा ९ वर्षांचा काळ हा अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण हाच काळ संभाजी महाराजांना महापराक्रमी का म्हटले गेले आहे याचा प्रत्यय करून देण्यास पुरेसा आहे.

केवळ २४ वर्षांचे असताना संभाजी महाराजांना औरंगजेब,पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांसारख्या कपटी गनिमांनी घेरेले गेले होते.गनिमांकडे दांडगा अनुभव होता पण संभाजी महाराजांकडे होती महत्त्वकांक्षा!याच महत्त्वकांक्षेच्या जोरावर त्यांनी पुढे सर्वच गनिमांना सळो की पळो करून सोडले होते.गोव्यातील पोर्तुगीजां विरोधात जेव्हा त्यांनी मोहीम उघडली होती तेव्हा स्वत:हून खाडीमध्ये उतरुन त्यांनी सैन्याचे नेतृत्व केले.कोकणातील रयतेची धर्माच्या नावाखाली पिळवणूक करणाऱ्या धर्मांधांना संभाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली.प्रजा त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पाहू लागली होती.

लहान असताना ज्या औरंगजेबासमोर ते नाईलाजाने झुकले होते त्याच औरंगजेबाची झोप त्यांनी उडवली होती. संभाजी महाराजांच्या सततच्या हल्ल्यांमुळे औरंगजेब संतापाला होता.
संभाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी नाईलाजाने त्याला दक्षिणेत यावे लागले. पण त्याच्या मार्गातून हटतील ते संभाजी महाराज कुठले?पाच लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या ७० हजारांच्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले.

विचार करा कुठे ती पाच लाखांची फौज आणि कुठे ते ७० हजार सैन्य!पण त्यांना आपल्या छत्रपतीवर विश्वास होता,त्यामुळे प्रत्येक जण मोघलांशी लढला आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी!औरंगजेबाला चरफडत रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. पण १६८९ साली स्वराज्याचा अमुल्य हिरा आपले छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे त्यांच्या हाती लागले आणि ११ मार्च १६८९ रोजी स्वराज्य रक्षणासाठी,स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले.

संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये ५००० किलोमीटरची भर घातली. त्यांनी दक्षिणेवर दोनदा स्वारी करून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांत स्वराज्याला जोडले.जंजिऱ्याजवळ फेसाळलेल्या लाटांना ठेचत ८०० मीटर लांबीचा पूल बांधला. आरमार वाढवून सागरालाही आपल्या कवेत घेतले.स्वराज्यात चार नवीन किल्ल्यांची भर घातली.जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला.युध्द भुमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार करण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली.स्वराज्याचा प्रथमच स्वतंत्र दारूगोळा कारखाना सुरु केला.

दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी बाजारपेठा स्थापन केल्या. बाल मजुरी व वेटबिगारी विरूध्द कायदे तयार केले.संभाजी महाराजांनी आपल्या सर्व शिलेदारांना इतके जपले होते की त्यांच्या कारकीर्दीमध्ये एकही बंडखोरी झाल्याची नोंद इतिहासामध्ये नाही.संभाजी महाराज जोवर हयात होते तोवर स्वराज्याची शान असणारा एकही किल्ला शत्रूच्या हाती गेला नाही…!

    अशा या कर्तबगार

महापराक्रमी,कर्तृत्ववान राजास जयंती निमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन!

लेखक: रमेश पवार
लेखक,व्याख्याते-बहीशाल शिक्षण केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.
(मो.७५८८४२६५२१)

ग्लोबल न्युज नेटवर्क: