मुंबई | विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन आठवडा झाला मात्र अद्यापही सत्तास्थापना झालेली नाही. शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी चढाओढ सुरुच आहे. जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्येला पराभवाची धूळ चारणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला.
मुक्ताईनगरमधून भाजपने एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. मात्र नाराज झालेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीमध्ये खडसेंच्या कन्येचा निसटता पराभव झाला. यानंतर चंद्रकांत पाटील विधानसभेवर निवडून आले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुक्ताईनगरमध्ये सभा घेत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीच नाही, तर शिवसेना आणि भाजपमधील काही नेते-कार्यकर्त्यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काम केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता.
लेकीच्या पराभवानंतरही खडसे आपल्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवत होते.
शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांकडून पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचले आहे. मात्र भाजपसोबत शिवसेनेचे अजूनही जुळलेले दिसत नाही. दुसरीकडे भाजपलाही 9 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 114 जागांवर पोहोचलं आहे.