चंद्रकांत पाटलांच्या विठ्ठल महापूजेला शिवसेनेचा विरोध, शेतकर्याला आमंत्रित करण्याची मागणी
पंढरपूर । कार्तिकी एकादशी दिवशी श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा काळजीवाहू सरकारमधील महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून यास शिवसेनेचे तालुका संघटक संदीप केंदळे यांनी विरोध केला असून यासाठी राज्यपाल अथवा शेतकरी वारकर्यास मान द्यावा अशी मागणी श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीकडे करण्यात आली आहे. जर चंद्रकांत पाटील महापूजेसाठी आले तर त्यांना विरोध करण्याचा इशारा प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजपा व शिवसेनेत कलगीतुरा रंगला असताना आता पंढरपूरमध्ये याचे लोण पोहोचले आहे. 8 नोव्हेंबर रोजी कार्तिकीच्या महापूजेसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यास शिवसेनेेने विरोध केला असून तालुका संघटक संदीप केंदळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, कोल्हापूर व सांगली भागातील पूरस्थिती हताळण्यास चंद्रकांत पाटील हे अयशस्वी झाले आहेत. पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळलेली नाही. पंढरपूरमध्ये ही अनेक पूरग्रस्तांना शासकीय मदतीपासून वंचित रहावे लागले आहे. पीक विमा, पंचनामे, शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दिलेली किती आश्वासन पूर्ण झाली हा संशोधनाचा विषय असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांनीच पुढाकार घेवून विठ्ठलाची शासकीय महापूजा ही राज्यपाल महोदय अथवा शेतकरी वारकर्यांकडून करून घ्यावी. याबाबतच्या भावना मंदिर समितीने तातडीने पाटील यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात व त्यांना महापूजेपासून रोखावे अन्यथा शिवसेना त्यांना पंढरीत येवून शासकीय महापूजा करू देणार नाही. असा इशारा मंदिर समितीला देण्यात आलेल्या पत्रात देण्यात आला आहे.