गैरसमज पसरवू नका, आमच्या कुटुंबाची जी परंपरा आहे ती कायम राहील – शरद पवार

पुणे । गेल्या चाळीस वर्षांपासून जास्त काळ राजकारणात असलेल्या आणि समाजकारण करणाऱ्या काकांवर ईडीने गुन्हा दाखल केला त्यामुळे आपण अस्वस्थ झालो आहोत असं अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं.

इतकंच नाही तर आपण राजकारण सोडून देऊ शेती किंवा व्यवसाय करु असाही सल्ला अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना दिला. ही माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या वृत्तासंदर्भात ते बोलत होते.

पुढे बोलताना म्हणाले पवार कुटुंबात यत्किंचीतही वाद नाही. पवार कुटुंबात कौटुंबिक कुठलेही निर्णय माझे असतात. आम्ही सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. आमच्या कुटुंबाची जी परंपरा आहे ती कायम राहील,

तसेच अजित पवार यांनी त्यांच्या मुलाला सांगितले की, काकांसारख्या व्यक्तीला काहीही दोष नसताना अशा गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यांचा काहीच सहभाग नसताना त्यांची चौकशी केली जाते, ही राजकारणाची पातळी घसरली आहे.

आपण यातून बाहेर पडलेलं बरं, आपण शेती किंवा व्यवसाय करू. हे राजकारण गलिच्छ स्तराचे आहे, असे अजित पवारांनी त्यांच्या घरी सांगितले असल्याचे शरद पवारांनी सांगितले. मात्र मी त्यांच्याशी या संदर्भात बोलेन, कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे, असेही पवार म्हणाले. माझं नाव आल्यामुळे अजित पवार यांची उद्विग्नता आहे. याविषयी मी त्यांना नक्की बोलेन, असेही पवार म्हणाले.

अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ‘माझे मोठे बंधू हयात असताना घरात सर्व निर्णय ते घेत होते. आता मी निर्णय घेतो.

या कौटुंबिक निर्णयाचा सगळे सन्मान करतात. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत असून, सगळे जण दिवाळीला एकत्र जमतो. या वेळी पुढच्या पिढीचे कार्यक्रम, धोरणे याबाबत चर्चा होते. त्यात वेगळे काही निर्णय आले, तर माझा निर्णय अंतिम असतो आणि आजपर्यंत तो पाळला गेला आहे. यापुढेही तसेच होईल, अशी मला खात्री आहे,’ असे सांगून, ‘आमच्या कुटुंबाच्या परंपरेला धक्का लागेल, असे काही छापू नका,’ अशीही टिपण्णी त्यांनी पत्रकारांना उद्देशून केली.

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा- आणि बातमी आवडली असल्यास शेअर करायलाही विसरू नका-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: