मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ‘गुगल सर्च’मध्ये देशभर ट्रेंडिग असल्याचे चित्र आहे. पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा क्रमांक लागतो. तर यानंतर उद्धव ठाकरे या नेत्यांबद्दल लोकांनी ‘गुगल’वर सर्वाधिक माहिती शोधली आहे. राज्याच्या राजकारणासोबतच सगळीकडेच शरद पवार हे आघाडीवर दिसत आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे मतदान 21 ऑक्टोबरला झाले. तर निकाल 24 ऑक्टोबरला लागला. त्या दिवशी शरद पवार यांच्याबद्दल ‘गुगल’वर सर्वात जास्त सर्च करण्यात आले. निवडणुकीच्या काळात शरद पवार यांनी झंजावाती प्रचार दौरे केले. राष्ट्रवादीतील अनेक नेते सोडून गेल्यानंतर पक्ष संपतो का अशा चर्चा सुरू असताना पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात जान आणली. सातारा येथे त्यांनी पावसात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. पवार यांच्या सभांना तरुण वर्गाने मोठा प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या.
या सर्व घडामोडींचा प्रभाव ‘गुगल’ सर्चमध्येही दिसला. त्यामुळेच निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार यांच्याबद्दल सर्वाधिक प्रमाणात माहिती सर्च करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत सातत्याने गुगल सर्चमध्ये शरद पवार ट्रेंडिंगमध्ये आहेत. ‘गुगल ट्रेंड’च्या माहितीवरून हे स्पष्ट होते. ‘गुगल सर्च’, ‘गुगल न्यूज’ आणि ‘यूट्यूब’ यांच्या एकत्रित सर्चवरून ‘गुगल ट्रेंड’ची आकडेवारी उपलब्ध केली जात असते. ‘गुगल ट्रेंड’वर 9 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या नेत्यांबद्दल तुलनात्मक ट्रेंड पाहिले असता ही माहिती मिळाली आहे.
‘या’ आठवड्यात संजय राऊत आघाडीवर
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. यामध्ये शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या संजय राऊतांचा महत्त्वाचा वाटा आहे. संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडली. वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या प्रतिक्रिया या सर्वात जास्त चर्चेत राहिल्या. तसेच सोशल मीडियावरही त्यांच्या पोस्ट जास्त प्रमाणात दिसल्या. त्याचे प्रतिबिंब ‘गुगल ट्रेंड’मध्येही पाहायला मिळाले. 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या काळातील ट्रेंड पाहिल्यानंतर संजय राऊत यांच्याबद्दल गुगलवर सर्वात जास्त सर्च झाले. 3 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक सर्च संजय राऊत यांच्याबद्दल झाल्याचे दिसून येते. यामध्ये ‘संजय राऊत न्यूज’, ‘संजय राऊत ट्विटर’ यासारखे सर्च नेटिझन्सनी केले आहेत.
सर्चची आकडेवारी
शरद पवार : 61 टक्के
देवेंद्र फडणवीस : 23 टक्के
उद्धव ठाकरे : 11 टक्के
संजय राऊत : ५ टक्के