क्रमशःभाग १; पती-पत्नी नातेसंबंध ! संध्याकाळी लवकर घरी ये…मी वाट पहाते…!

आदेश दिसायला राजबिंडा ,व्यवसायात खूप नाव कमावलेला ,इराच्या वडिलांची प्रथम पसंती असलेला…अतिशय मितभाषी…कामाशी अत्यंत प्रामाणिक आणि त्यात स्वतःला झोकून देणारा. बिझिनेस पार्टीत बऱ्याचदा इरा आणि आदेश एकमेकांना भेटत असत.पण आदेश कधीही तिला बिझिनेस व्यतिरिक्त काहीही विचारत नसे. इराही तिच्या बाबांना बिझिनेसमध्ये मदत करत असे त्यामुळे आदेशचे सल्ले तीला फायदेशीर वाटत असत. एक माणूस म्हणून आदेश खूपच संयमी आणि संतुलित आहे असे सर्वांचेच मत होते.

इराच्या आईच्या पुढाकाराने आदेशचे आणि इराचे लग्न ठरविण्यात आले होते.लग्नासाठीच्या झालेल्या पहिल्या वहिल्या भेटीतही ते दोघे एकमेकांना ओळखीचेच असल्यामुळे आणि कुटुंबेही जाणून असल्यामुळे…दोघांनीही घरच्यांना होकार कळवला होता. इराच्या मनावर आदेशची कर्तबगारी पुरुषाची छाप तिला त्याच्या प्रेमात पडायला नेहमीच भाग पाडत असे पण ती हसण्यावरी सोडून देई.पण आत्ता तर ती त्याची बायको झाली होती हक्काची…मनोमन खूपच प्रेम करत होती ती…आदेशवर…कौतुकानं भरलेलं आदरयुक्त प्रेम…

इरा खिन्न होऊन आपल्याच मनाचा उतारचढाव मोजत होती.तिला कशाचाही अंदाज येत नव्हता. असं एकदम तीचं मन नाही म्हणत होतं.ओळखीचा वाटणारा हवाहवासा आदेश अचानक अनोळखी वाटत होता.मनातली ओढ तर गेलीच पण नकोसं का होत होतं…

कुठेतरी..काहीतरी…उणे होतं दोघांमध्ये जे भरून निघायला हवं होतं.

“नाही…नको…आपण ह्यासाठी वेळ घ्यावा.असं…प्रेम एका क्षणात मनातून मिलनाकडे समर्पित भावनेने व्हायला हवे.अजून आम्ही एकमेकांना पुरेसा वेळही देत नाहीये.लग्नाआधीची जेवढी ओळख आहे तेवढीच. “स्वतःशीच पुटपुटत तीने तो गुलाबी गाऊन कपाटात ठेवला.आदेशजवळ स्पष्टपणे बोलण्याची तिची मनाची तयारी झाली होती.

“माळून गजरा तुजसाठी.हर्षगंध मजला होइ तुझ्या डोळ्यातील जादु मग मज वेडावून जाते..मी वाट पहाते.

“ते काही नाही आपण जबरदस्ती काहीही करायचं नाही. मन जुळल्यानंतरच पुढे जायचं तोवर नाहीच नाही. पण मनाची साद त्याला ऐकूही यायला हवी.आपण आपल्या रीतीने सुरुवात करू या.” पुन्हा एक उमेद घेऊन इरा तयारीला लागली.

सुंदर गुलाबी कलरची प्लेन साडी. लग्नाचाच हिरवा चुडा..केसात गुलाबी गुलाब तिने रोवला होता.स्वतःला आरश्यात जसं तीने निहारलं तसं तिच्या कानातले मोत्याचे डुल चकाकले.डुल चकाकले तशी ती पुन्हा खुदकन हसली.स्वतःच्या हाताने त्याला एक टिचकी देऊन ते पुन्हा चकाकले…कधी डावं ,कधी उजवे असं त्या खेळात रममाण झाली.स्वतःची गालावरली खळी गुलाबी होत होती…तशी एक टिचकी गालावर..कुणीतरी दिली..

“अरे आदेश तु ???”म्हणत इराने आरश्यात पाहिले तशी ती दचकून चटकन मागे वळली
मागे आदेश येऊन तीचा आरश्यातला खेळ बघत थांबला होता.

मुद्दामच त्याच्या नजरेला नजर न मिळवता इरा तिच्या लॅपटॉपवर मेल चेक करायला लागली. “झोपली नाहीस” तिच्या समोर बसत आदेशने विचारलं तसं तीने वर न बघता “नाही कंटाळले होते” एवढंच म्हणाली व पुन्हा मेल चेक करू लागली. “तुला गिफ्ट मिळालं…” काहीश्या दबक्या आवाजातच आदेशने विचारलं… “होय…मिळालं” म्हणत तीने आदेशकडे न पाहता बाल्कनीत जाऊन उभी राहिली.मंद वारा सुटला होता.मोगऱ्याचा सुगंधही दरवळत होता.चांदणं जसं तिच्या मनातून थेट आकाशात हितगुज करत होतं… “सॉरी इरा , मी असाच लेट होतो नेहमीच…
कामात लक्षच रहात नाही.आज पण असंच झालं… शेवटी आईचा फोन आला…ती संतापातच म्हणाली ,
“इरा तुझी बायको…नुसतीच आणून ठेवलीय असं करू नकोस थोडं लवकर ये ना…!!”

इराच्या कपाळावर आत्ता आठ्या पडल्या ,” काय माणूस आहे हा स्वतःहुन सांगतो आहे आपल्या चुका असो…एवढं छान जेवण केलं ते तरी बोलायचं…कवितेचं तर कर्मच…समजलं तरी असेन का…एक नंबर टिपिकल बिझ्झनेस मॅन…म्हणे तयार होऊन बस्स…मी काय…”

स्वतःशी तिचा संवाद आदेशच्या पुढल्या वाक्याने पूर्ण झाला ,… “नुसतीच आणून ठवलीयेस का… “
इरा दचकली ,”हं… हं”..,
“नाही नाही काही नाही अगं आई कधी कधी बोलते मला संतापाच्या भरात…पण हेतू खूप चांगले असतात तिचे…”

बोलता बोलता आदेशने दोन वेळा फोन कट केला मग तिसऱ्यांदा त्याने घेतलाच ,त्याच्या आईचा फोन होता,
” हो …आई मी पोहचलो… सगळं ठीक… हो… हो …हो …गुड नाईट “

चमत्कारिक पद्धतीने त्याने रूमवर सर्वत्र नजर फिरवत ,”बरं इरा तू ती ते …ते गिफ्ट…”
“आत्ता ती वेळ आलीच.हेच हवं असतं ह्या पुरुषांना…माझ्या मनाची रत्ती भरही किंमत नाहीये…मी दिवसभर काय केले…जेवले की नाही…कित्ती वाट पाहिली…ह्याला काही काही मोलच नाहीये…लग्न झालं की पहिले ह्यांना तो आनंद हवा…बस्स…”

बऱ्याचवेळा पासूनचा धरून ठेवलेला इराचा संयम त्या गिफ्टच्या उल्लेखाने तुटला होता.आदेशचं पुढचं काहीही न ऐकता , एक जळजळीत कटाक्ष टाकत ती पाय आपटतच आत येऊ लागली…
तसं आदेशने तिचा हात जोरात पकडत तिला…थांबवले…,

“ऐक ना …तो गाऊन…मला…” पुन्हा तेच ऐकताच तस्साच हाताला हिसका देत …त्याच्या हातातून तिचा हात सोडला आणि त्यानेही घाबरून लगेचच तो सोडला…त्याला जोरात मागे ढकलत…ती सोफ्यावर येऊन बसली…आत्ता मात्र तिचे सारे अवसान गळाले होते.

“मला नको हे सर्व…नको …नको…”म्हणून रडू लागली.
आदेश घाबरून तिच्याजवळ आला पण ती एवढी का चिडली म्हणून परत मागे जाऊन थांबला… इराचे नक्की काय बिनसले,आपले नक्की काही चुकले का? … हे आदेशला समजतच नव्हते.पण तरीही तिला शांत करावे म्हणून तिला हातही न लावता ….दुरूनच…, “इरा तू झोप…आपण उद्या बोलू…नको तर नको…तू शांत हो..काय झाले तुला…रिलॅक्स”,म्हणत तो रूमच्या बाहेर निघून गेला.

…इरा वॉशरूमच्या आरशात पाहून खूप बेचैन झाली.हळूच केसातील गुलाबी गुलाब तीने काढून टाकला, तो गुलाब मात्र अजूनही टवटवीत दिसत होता.कानातले डुल अजूनही तशीच चकाकी देत होते.इराचा चेहरा मात्र रडून रडून सुजला होता. चेंज करून तीने बेडवर स्वतःला झोकून दिलं…दिवसभराच्या थकव्याने,उदासीने ती कधी झोपली ते कळलेच नाही…गाढ निद्रेच्या कुशीत तिची ती …लग्नानंतरची आतुर संध्याकाळ सरली होती. पहाटेला जाग आली तशी ती भानावर आली. “अरे आदेश दिसत नाहीये…,काल रात्रीचा बाहेर गेलेला…अजून आलाच नाही…” तीचं हृदय जोरजोरात धडकत होतं. काल रात्री आदेशसोबतचं तीचं वागणं तिला अचानक खटकू लागलं.अचानक आदेशचा शांत संयमी चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला होता.

“आपण जरा जास्तच रिऍक्ट झालो काल… खरं तर त्याने काहीच चुकीचे केले नव्हते…एवढं बावळटासारखं कसं वागलो आपण…त्याने फक्त सांगितलं होतं गाऊन घाल पण जबरदस्ती तर केली नाही ना…आपण तरी कुठे व्यवस्थित वागलो…तो आहेच शांत…त्याचा दिवस व्यस्त असेल तर…तो जेवला तरी का …आपण विचारलेही नाही…छे आपण… आपल्याच विश्वात….!!!! आदेश कुठे गेला कळत नव्हतं.

“इतक्या लवकर उठलीस ? कॉफी घेणार ?”सासूबाई किचन मध्ये स्वतः साठी कॉफी बनवत होत्या.
“आई, आदेश …कुठे…गेलेत…दिसत नाहीये”
“अगं तो आहे स्टडी रूम मध्ये…तो तिथेच असतो…तू आली म्हणून तरी रूममध्ये येत तरी असेल…आधी तर तिथेच”,सासूबाईंनी मस्त वाफाळलेली कॉफी तिला दिली.

“…चल इकडे बसू यात” ,म्हणून त्या दोघीही गप्पा करू लागल्या,
” आदेशचं स्टडी रूम म्हणजे मंदिर आहे मंदिर…बरं का तिथे कुणालाच प्रवेश नाहिये…अगदी कुणालाच…त्याची साफसफाई , झाडू सर्व सर्व तोच करतो…”

….इरा अगदी आश्चर्यचकित झाली हे काय नवीन ऐकल्यासारखे… सासूबाई पुढे बोलु लागल्या, ” खरंच नवल वाटतं ना…पण तसंच आहे…ते तर मीच हट्ट करून त्या गणेशला त्याच्यासोबत ड्रायव्हर म्हणून ठेवलेय…त्याचे वडील गेला तसा तो अगदी स्वावलंबी झाला.मला त्रास नको म्हणून कधीही लवकर उठून स्वयंपाक करू दिला नाही.आत्ता नोकर असूनही सवय सोडायची नाही,आपल्यामुळे त्रास नको म्हणून तसाच बाहेरच जेवतो मित्रांसोबत…”

इराला आदेशची नवीन बाजू कळली आणि स्वतःचीही…तिचं मन बेचैन झालं होतं.आदेशला कसं सामोरं जाऊ. तो काय विचार करत असेल…आपल्याबद्दल.त्याच्या ओढीने पुन्हा बेचैन झाली.

“हे काय चाललंय माझं …कधी रागावते ,चिडते…पुन्हा फिरून त्यालाच भेटायचं असतं… सहजीवनाची स्वप्न बघत असते…मला तो जवळ असावा असं का वाटतं आणि समोर आला की…. त्याची ती विचित्र मागणी…” इरा त्या बँद स्टडी रूमच्या बाहेर थांबून आदेशला ओळखू पहात होती.

दोघांमधला हा बंद दरवाजा साक्षी होता…त्यांच्या आतुर मिलनाचा…इरा जणू सागराला भेटण्यास आतुर सरितेसारखी लाटांबरोबर हेलकावे खात आदेशपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होती.

क्रमशः
पूनम तावडे लोखंडे

ग्लोबल न्युज नेटवर्क: