कोल्हापूर व माढ्यातील पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ला धक्का

पार्थ पवार यांचा मावळमधील पराभव ही जिव्हारी
पंढरपूर – पश्‍चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला असून येथील कोल्हापूर व माढा या दोन जागा त्यांना या लोकसभा निवडणुकीत गमवाव्या लागल्या असून येथे महायुतीने मसुंडी मारली आहे. याचा परिणाम आगामी विधानसभा रणधुमाळीत देखील पाहावयास मिळेल असे दिसत आहे. यातच मावळ मध्ये शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ ही पराभूत झाले आहेत.
दरम्यान माढा व मावळ या दोन्ही जागा घड्याळाला अनलकी ठरल्या असल्याचे चित्र आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांचा फेव्हरेट मानला जातो. 2009 ला पुनर्रचनेनंतर प्रथम झालेल्या निवडणुकीत ते स्वतः येथून उभे राहिले व तीन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले होते. या मतदारसंघावर त्यांचे सर्वाधिक लक्ष होते. 2019 च्या निवडणुकीत तेच येथून उभारणार अशी चर्चा होती व त्यांनी यास मान्यता दिली. मात्र मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांचे नाव पुढे आल्याने शरद पवार यांनी एकाच घरातील तीन जणांनी लोकसभा लढविणे योग्य दिसणार नाही यासाठी माढ्यातून आपली उमेदवारी मागे घेतली व मावळमध्ये नातू पार्थ यांना उभे केले व माढ्याच्या जागेवर संजय शिंदे यांना तिकिट देण्यात आले.
दरम्यान या निवडणुकीत माढा व मावळ या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी पराभूत झाली आहे. तर कोल्हापूर ही हक्काची जागा त्यांना गमवावी लागली आहे. येथे खासदार धनंजय महाडिक हे पराभूत झाले आहेत. 2014 ला मोदी लाटेत ही महाडिक कोल्हापूरमधून विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांना विजय मिळविता आला नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूरच्या जागेला महत्व असून येथे आता शिवसेना विजयी झाली आहे. तर माढ्यात भाजपाची सरशी झाली आहे. राष्ट्रवादीने 2014 ला मोदी लाटेत कोल्हापूर व माढ्याच्या जागा राखल्या होत्या.यंदा त्यांना प. महाराष्ट्रातील सातारा, बारामती या जागा आपल्याकडे राखण्यात यश आले असून शिरूरची जागा राष्ट्रवादीने शिवसेनेकडून खेचून घेतली आहे. तर कोकणातील रायगडमध्ये पवार यांचे निकटवर्तीय सुनील तटकरे ही विजयी झाले आहेत.

admin: