कोल्हापूर चा जोतिबा अन केखले चा दवणा

ग्लोबल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: आपण दख्खन चा राजा जोतिबा च्या यात्रेला जात असाल तर आपणास माहीत असेल की देवाला दवणा वाहिला जातो, वर्षभर जोतिबाच्या चरणी केखलेचा दवणा …पन्हाळा तालुक्यातील केखले गावातील दवणा म्हणून सर्वत्र परिचित असून चैत्र महिन्यात या गावास मोठे महत्त्व येते.

श्री क्षेत्र जोतिबा देवाला गुलाल, खोबरे याबरोबरच दवणा ही वनस्पती अर्पण केली जाते. श्री जोतिबाच्या पायथ्याशी वसलेले हे छोटे केखले हे गाव. मुळातच पारंपरिक पीक म्हणून उसाची शेती केली जाते. तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात छोटे-मोठे शेतकरी हे दवणा हे पीक घेतात. संपूर्ण गावाच्या क्षेत्राचा विचार पाहता २० एकर क्षेत्र या पिकासाठी वापर केल्याचे दिसून येते. या गावाला हे पीक घेण्याची पारंपरिक धार्मिक प्रथा असून आजही या वनस्पतीमुळेच चैत्र यात्रेत महत्त्व येते. पीक घेणारा शेतकरी हा धार्मिक कुलाचार पाळतो. पन्हाळा पूर्व भागातून अनेक भाविक चालत जाताना केखले गावातून जातात त्यावेळी दवणा या वनस्पतीची सुंगधी दरवळ पाहून चैत्र यात्रेची चाहूल लागल्याची जाणीव त्यास होते. गावातील रामराव तुकाराम पाटील, अरुण बाळासाहेब पाटील, संदीप मिस्त्री, आनंदा यशवंत नरके, आनंदा शिंदे, दिलीप पाटील, बाबासाहेब पाटील, नितीन पाटील, शिवाजी पाटील, भानुदास पाटील, संग्राम पाटील यांच्यासह अन्य शेतकरी दवणा हे पीक पिढीजात घेत असतात. नोव्हेंबर महिन्यात या पिकाचे रोपण केले जाते. त्यानंतर सहा महिन्यात हे पीक येते. सुरुवातीस ओला दवणा देवाला अर्पण केला जातो. मार्च व एप्रिल महिन्यात वाळलेल्या दवण्याची विक्री केली जाते. चार वनस्पती काडी करून पाच रुपये दराने विक्री केली जाते. जोतिबासह शनी शिंगणापूर, नाईकबा या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीही दवणा अर्पण केला जातो. मूळ संस्कृत ‘दमना’ नाव असलेली ही औषधी वनस्पती मूळची काश्मिरमधील हिमालयातील आहे. नावाप्रमाणे वात, पित्त, कफ या त्रिदोषाचे दमन करणारी ही वनस्पती औषधी तर आहेच व सुवासिकसुद्धा. तापांचे दमन करण्यासाठी आणि उन्हाळ्यात याचा वापर होत असल्याने याला महत्त्व आहे. आजही चैत्र यात्रेत या दवणा विक्रीसाठी व्यापारी केखले गावात ये-जा करीत आहेत. सध्या शेतात दवणा काढणी सुरू असून जशी जोतिबा यात्रा जवळ येत आहे, तसतसे दवणा सुगंध सर्वत्र परिसरात दरवळ असल्याचे चित्र आहे.

श्री क्षेत्र जोतिबा देवाला दवणा अर्पण करण्यासाठी केखले गावाला महत्त्व आहे. निव्वळ देवाला अर्पण करण्यासाठी या वनस्पतीचा वापर न करता औषधी वनस्पती म्हणून खोकला,पोटदुखी यावर वापर होऊ शकतो त्यासाठी संशोधन होणे गरजेचे असल्याचे
केखलेकर पाटील यांनी सांगितले.

admin: