ग्लोबल न्यूज – पुण्यातील कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा. त्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यान्वित केलेल्या वॉर रूम प्रणालीची कार्यपद्धती उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी समजून घेतली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त, शांतनु गोयल, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेने ही प्रणाली विकसित केली आहे. याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली आहे. बाधित रुग्ण, शहरातील बाधित क्षेत्र, वाढत असलेला परिसर याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे उपाययोजना करणे सोपे झाले आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले. बेडची उपलब्धता, भविष्यात लागणारे बेडस्, डॉक्टरांची संख्या या डॅश बोर्डवर नमूद आहे, असे रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
कोरोना बाधित रुग्णाचा फोन आला तर तातडीने रुग्णवाहिका पोहोचली पाहिजे. भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडीप्रमाणे इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर कार्यान्वित करा, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. पुण्यातील कोरोनाचे संकट तातडीने आटोक्यात अण्णा, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यकता असेल तर निधीची मागणी करा, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी खासदार गिरीश बापट यांनी अजित पवार यांनी लोकप्रतिनिधीची बैठक घेतली नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शुक्रवारी बैठक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात कोरोना वाढत असल्याने भाजप महाविकास आघाडी विरोधात आक्रमक झाला आहे. शहरातील नेत्यांनीही एकमेकांविरोधात जोरदार आरोप प्रत्यारोप केले होते.
कोरोना’च्या संकटाबाबत भविष्यातील धोका ओळखून नियोजन करा व सर्व यंत्रणांनी समन्वय राखून कर्तव्य बजावा, अशा सूचना केल्या. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त लावावी लागणार आहे. वैयक्तिक मास्कचा वापर, योग्य अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी लागणार आहे.
सूक्ष्म नियोजनाद्वारे प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करा. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या सीमेबाहेरून कुणी व्यक्ती येत असल्यास काटेकोरपणे तपासणी, संस्थात्मक विलगीकरण या गोष्टी पाळल्या गेल्याच पाहिजेत.
बाहेरून येऊन कुणामार्फत संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरून येणाऱ्या बाधित व्यक्तींमध्ये अनेकदा ‘कोरोना’ची लक्षणं दिसत नाहीत. परंतु त्यांच्या मार्फत संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्याबाबत काटेकोर कार्यवाही व्हावी. आवश्यक तिथे इतर यंत्रणांचे सहकार्य घ्यावे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून काम करावं.
कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं, हे आज आपल्या पुढील सर्वात मोठं आव्हान आहे. शासन, प्रशासन, विविध यंत्रणा अनेक आघाड्यांवर लढत आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणं आवश्यक आहे. ससून रुग्णालयात कोरोना चाचण्या वाढविण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाकडून आवश्यक निधी तातडीनं देण्यात येईल. रुग्णालयात उभारण्यात येणा-या कोरोना चाचणी तपासणी केंद्राचा इतर साथीच्या आजारासाठीही उपयोग होणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शैलेंद्र पाठक यांनी तयार केलेल्या कोविड केयर सॉप्टवेअरचे अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं.
पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या ५ जिल्ह्यातील कोरोनावर उपचार करणा-या हॉस्पीटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत करता येण्यासाठी या सॉफ्टवेअरची मदत होणार आहे.