काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड; पिचड, कोळंबकर, शिवेंद्रराजेंचा पक्षाला रामराम

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक मोठा राजकीय धक्का काँग्रेस-राष्ट्रवादीला मंगळवारी बसला आहे. साताऱ्याचे वजनदार नेते आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केला आहे. त्यांच्यासह काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर आणि राष्ट्रवादीचे वैभव पिचड व संदीप नाईक यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगूनदेखील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पक्षाचा हात सोडला.  हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला पडलेल्या या खिंडारामुळे पक्षाचे राजकीय भविष्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पक्षातून एखादा नेता गेल्यास पक्ष संपत नसतो, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर दिली होती. यावर आत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

आपल्या राजीनाम्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणतात, ‘ सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आता येईल असे तरी वाटत नाही. असे झाल्यास जनतेची कामे कशी करायची, असा प्रश्न उपस्थित करत मतदारसंघातील जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेणे भागच होते. 

‘पवारांबद्दल अजूनही आदरच’

दरम्यान, शरद पवारांनी वारंवार सांगून देखील शिवेंद्रराजे भोसलेंनी राजीनामा दिला. त्यामुळे पवारांच्या शब्दाला देखील मान नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ‘शरद पवारांचा अजूनही आदर आहेच. शिवाय अजितदादांचंही मला मार्गदर्शन मिळालं आहे. आमचे थोरले बंधू उदयनराजेंचंही मार्गदर्शन मिळत राहीलच. पण या सगळ्यापेक्षा मला माझ्या मतदारसंघातली कामं होणं महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: