काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार याच आठवड्यात राजीनामा देतील – चंद्रकांत पाटील

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार याच आठवड्याभरात राजीनामा देतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आपण निवडून येणार नाही, हे कळल्यामुळेच काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्वतःच राजीनामा दिला आहे. या स्थितीत या पक्षामध्ये सध्या अस्वस्थता आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांतील काही आमदार याच आठवड्यात राजीनामा देतील. फक्त आपण त्यांची नावे आताच सांगणार नाही, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सार्वत्रिक निवडणुकीला सहा महिने शिल्लक असताना राजीनामा दिला तर त्या मतदारसंघात पोटनिवडणूक होत नाही. आता तर निवडणुकीला तीन महिने राहिले आहेत. हे लक्षात घेऊनच विरोधी पक्षातील काही आमदार राजीनामा देतील. जीवनाची मजा अनिश्चिततेच आहे. त्यामुळे या आमदारांची नावे मी आता सांगणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेस पक्षाने राज्यात नेमलेल्या चार कार्याध्यक्षांपैकी कोणी पुढील काळात भाजपत आला तर आश्चर्य वाटायला नको, असेही त्यांनी म्हटले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: