काँग्रेसचे जीवनदत्त आरगडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत बार्शीत उलटसुलट चर्चा


काँग्रेसचे जीवनदत्त आरगडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत बार्शीत उलटसुलट चर्चा

बार्शी: विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यास एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी निश्‍चित झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीकडून कोण मैदानात असणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. जीवनदत्त आरगडे यांनी आज मुंबईत अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मकरंद निंबाळकर, निरंजन भूमकर की अ‍ॅड. जीवनदत्त आरगडे  यांना मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाविना पोरकी झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे वैरागचे निरंजन भूमकर, माजी जि.प. सभापती मकरंद निंबाळकर, अ‍ॅड. विक्रम सावळे, संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद ही नावे चर्चेत होती. त्यांनी मेळावे घेवून राष्ट्रवादीचे वातावरण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

भूमकर व निंबाळकर यांनी आम्हा दोघांपैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही एकनिष्ठेने राष्ट्रवादीचे काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. भूमकर, निंबाळकर या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष असे अर्ज देखील दाखल केलेले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आ. राजेंद्र राऊत यांनादेखील उमेदवारीसाठी गळ घातल्याची चर्चा आहे.

मात्र त्यांनी कोणत्याही परिस्थितीत अपक्ष लढणार अशी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचा नाविलाज झाला. दरम्यान राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेली नसतानाच काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम करणारे अ‍ॅड. जीवनदत्त आरगडे यांनी अचानक मुंबईमध्ये अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यावेळी संतोष ठोंगे हे उपस्थित होते.

या प्रवेशानंतर सोशल मिडियावर आरगडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर अशा पोस्ट फिरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आरगडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला हे खरे आहे. मात्र पक्षाच्या बार्शीच्या उमेदवाराचा एबी फॉर्म माझ्याकडे आहे. आमचे सहकारी पक्ष व मराठा संघटना यांची  बार्शीचा सामाजिक समतोल पाहता  बार्शीची राष्ट्रवादीची उमेदवारी मराठा उमेदवाराला द्यावी असा आग्रह आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करुन उमेदवारी निश्‍चित केली जाईल, असे ते2 म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: