कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या कार्यकर्तृत्वाची यशोगाथा लहानथोरांना प्रेरणादायी:आज जगदाळे मामांची पुण्यतिथी:,जाणून घ्या मामांविषयी

  • प्रा. चंद्रहंस बा. गंभीर, बार्शी

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची जयंती आपण दरवर्षी थाटामाटाने साजरी करतो. निवृत्ती गोविंदराव जगदाळे हे त्यांचे नांव. संपूर्ण समाज मात्र त्यांना मामा या आपुलकीच्या शब्दाने संबोधतो. नियतीनं शून्य दिल. त्याचे शंभर करुन दाखविणारे असे आपले मामा. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची यशोगाथा लहानथोरांना प्रेरणादायी ठरते. सारा महाराष्ट्र अज्ञानरूपी अंधकाराच्या विळख्यात पिचत पडलेला. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब हिरे याच शृंखलेतील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे होत. समाजहितासाठी भव्य उदात्त स्वप्ने पाहणे आणि त्यांची कष्टाने परिपूर्ती करणे हे मामांचे ध्येय. मामांचे जीवन म्हणजे एक तपश्चर्याच. मामांचा ४ फेब्रुवारी १९०३ चा जन्म. मातेने ‘निवृत्ती’ हे ठेवलेले नाव पुढे त्यांनी सार्थकी करुन दाखविले. “नर करनी करे तो नारायण बन जाय” या संतउक्तीचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे “मामा”.


‘असंख्य घरटी बांधीत गेला, त्यास आपुले घरटे नाही” स्वप्रपंचाला लाथ मारुन मामांनी अनेकांचे संसार थाटले. जनावराप्रमाणे जगणारा बहुजनसमाज शिक्षणाशिवाय स्वावलंबी होऊ शकणार नाही हे मामांनी ओळखले. निश्चय केला. पारतंत्र्याचा काळ. बहुजनसमाज गरीबीत डुबलेला. शिक्षण घ्यायचे म्हटले तर भाकरीची व राहण्याची सोय असणे आवश्यक. त्यामुळे मामांनी १९३४ साली बार्शी येथे शिवाजी बोर्डिंगची स्थापना केली. केवढी ही दूरदृष्टी ! दुसऱ्याच्या सावलीत उभा राहण्यापेक्षा स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक असते. मामांनी बार्शी तालुका व उस्मानाबाद जिल्हयात ठिकठिकाणी माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये निर्माण करण्याचा महत्प्रयास
केला. ज्ञानमंदिरे फुलू लागली. हाती घेतलेले कार्य पार पाडताना मामांना स्वतःचीही पर्वा नसायची. १९५० चा प्रसंग. प्रत्येक इमारतीच्या कामात मामा स्वतः जातीने लक्ष देत. अशाच सूचना देत असताना अचानक ते भिंतीवरुन खाली कोसळले. त्यांना दवाखान्यात दाखल केले. दवाखान्यातही स्वतःच्या प्रकृतीपेक्षा बांधकामाचीच काळजी त्यांना वाटायची. मामांनी श्रमाचे महत्व जाणले होते. त्यांना विश्रांती म्हणजे शिक्षा वाटे “कामात राम शोधा” असे मामा म्हणायचे. सहकार्याने सत्कार्य घडत असते. हे मामासाहेबांना पूर्ण माहित होते. संस्थेसाठी झटणारी माणसे त्यांनी जवळ केली. संभाजीराव बारंगुळे, बापुराव मोहिते, भगवंतराव कांबळे, टी.बी. जगदाळे, अंबादास पाटील, रेवडकर आण्णा, बापूराव पाटील, टी.एन. पाटील, मोहिते दादा, अँड ए वाय. यादव, श्रीधर पाटील, डॉ बी वाय यादव, डॉ. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने मामांनी अनेक ज्ञानमंदिरे सुरु केली व वाढविली. ६ महाविद्यालये, १४ माध्यमिक विद्यालये, ५ प्राथमिक शाळा, ५ वसतीगृहे, २ कृषी विद्यालये, १ तंत्रनिकेतन, २ अध्यापक विद्यालये, लॉ कॉलेज, १ नर्सिग कॉलेज या ज्ञानमंदिरातून ज्ञानप्रकाश घेऊन लाखो विद्यार्थी बाहेर पडून स्वावलंबी जीवन जगत आहेत. मामांचा उच्च कोटीचा त्याग पाहून कोणाचेही हात त्यांच्यापुढे जोडले जातात. आपण आपल्या कुटुंबाचा शिक्षणाबाबत विचार करतो. पण मामांनी समाजाच्या शिक्षणाचा विचार केला. स्त्री शिक्षणासाठीही जिजामाता विद्यालय सुरु केले. देशाचे संरक्षण करताना वीरमरण आलेल्या वीर जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी चा मामा सत्कार करत. यावरुन स्त्रीसन्मान व राष्ट्रभक्तीने प्रेरीत असे त्यांचे कार्य आपणापुढे आदर्शवादी ठरते. विद्यार्थ्यांविषयीची कळकळ त्यांच्या ठायी होती. अभ्यासासाठी पहाटे उठविणे, आरोग्य सांभाळण्यासाठी सकाळी रनिंग करायला लावणे, वेळेचे महत्व लक्षात आणून देणे. या गोष्टी मामा स्वतः लक्ष देऊन विद्यार्थ्यांकडून करवून घेत. समाजहितासाठी ज्ञानमंदिराबरोबरच मुद्रणालय, गोसंवर्धन केंद्र, कुक्कुटपालन व आरोग्य मंदिर उभारले. डॉ बी.वाय. यादव व डॉ. गुलाबराव पाटील यांना हाताशी धरुन मामांनी प्रथम एक छोटा दवाखाना सुरु केला. आज तेच “मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल’ ३ मजली भव्य व सुसज्ज असे रुग्णसेवेसाठी उभे आहे. संपूर्ण मराठवाडा व बार्शी परिसरातील रुग्णांची सेवा सर्व डॉक्टर्स अत्याधुनिक उपकरणांनी व औषधप्रणालीने करत आहेत. मामासाहेबांनी स्वतःच्या हाती निखारे घेतले व आपणा सर्वांच्या हाती फुले दिली. मामांना खोटेपणा, नाटकीपणा व स्वार्थ आवडत नसे. श्रमनिष्ठा, निर्णय क्षमता, स्वच्छ चारित्र्य, साधी राहणी, उच्च व परोपकारी विचारसरणीने युक्त असे मामांचे आयुष्य होते. ते सर्वांना खरोखरच प्रेरणादायी आहे. आज कर्मवीर मामांचे कार्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव व त्यांचे सहकारी सेवाभावी वृत्तीने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज कर्मवीर मामांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन….

admin: